पुणे : १ जूनपासून हुलकावणी देणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने अखेर रविवारी (ता. २१) पुण्यात जोरदार हजेरी लावली. तीन वाजताच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला, परिणामी गेले अनेक दिवस वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र त्यासोबतच वाहतूक कोंडी, अपघात आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरात सकाळपासून निरभ्र आकाश होते. मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि ढगांची दाटी झाली. तीन वाजताच्या सुमारास शहरातील डेक्कन, शिवाजीनगर, सिंहगड रस्ता, बाणेर, औंध, बालेवाडी, कोथरूड, स्वारगेट, धनकवडी, कात्रज, हडपसर, कोंढवा, बावधन, पाषाण आणि बिबवेवाडी यांसह विविध परिसरांमध्ये पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या. काही भागांत पावसाचा जोर अधिक होता, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील वाहनचालकांची, विशेषतः दुचाकीस्वारांची मोठी गैरसोय झाली. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.
महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल
पहिल्याच जोरदार पावसाने पुणे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांच्या तयारीचे पितळ उघडे पाडले. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसेनासे झाले, ज्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले. नालेसफाई आणि गटारे साफ करताना काढलेला गाळ महापालिकेने रस्त्यावरच तसाच टाकून दिला होता. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाताना हा सर्व गाळ पुन्हा गटारातच जमा झाला. अनेक ठिकाणी चेंबरच्या झाकणांमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. या पहिल्याच पावसात महापालिकेची तयारी अत्यंत अपुरी आणि फसवी ठरली असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
साडेबारा कोटींचा निधी ‘पाण्यात’
शहरात पावसाचे पाणी साचू नये, यासाठी ड्रेनेज विभागाने यंदा १२.५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला होता. या अंतर्गत लगड मळा परिसरात कामही करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे हे काम पूर्णपणे चुकीच्या ठिकाणी करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी साचते, तिथे उपाययोजना करणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून थेट विरुद्ध दिशेला ड्रेनेजचे काम केले. परिणामी, निधी खर्च होऊनही पाणी तुंबण्याची समस्या जैसे थे असून, करदात्यांचे साडेबारा कोटी रुपये अक्षरशः वाया गेले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेचे अभियंते आणि त्यांनी नेमलेले सल्लागार नेमका काय अभ्यास करून कामाचे नियोजन करतात?, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कचऱ्यातील तेलामुळे रस्ते निसरडे
शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्याकडेला साचलेल्या कचऱ्यातील तेलकट पदार्थ पाण्यासोबत वाहून थेट मुख्य रस्त्यावर आले. यामुळे काही भागांतील रस्ते अतिशय निसरडे झाले होते. परिणामी, दुचाकी घसरून नागरिकांचे अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने धाव घेत येरवडा परिसरातील गुंजन चौक आणि औंधमधील ब्रेमेन चौक येथे बॅरिकेडिंग करून खबरदारीचा उपाय योजला.
पहिल्याच पावसात बत्ती गूल
मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे शहराच्या अनेक भागांत वीजपुरवठाही खंडित झाला होता. कोथरूड, बाणेर, धनकवडी, कात्रज, धायरी, नऱ्हे, सिंहगड रस्ता आणि हडपसर परिसरात काही काळ वीज बंद होती. या सततच्या समस्येबाबत अनिकेत पाटील या नागरिकाने संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘थोडासा पाऊस पडला, तरी वीजपुरवठा खंडित होतो. हे शहरात दरवेळी घडते, त्यामुळे महावितरणने यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.’’
पुढील चार दिवस सतर्कतेचा इशारा
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, शहरात पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.