कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड) येथील एमआयडीसी परिसरातील 'हार्मनी ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या रासायनिक कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई करत उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीकडून घातक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हार्मनी ऑर्गेनिक्सवर प्रदूषणाचे गंभीर आरोप झाले आहेत. कंपनीच्या परिसरात घातक कचऱ्याची साठवणूक अयोग्य पद्धतीने केली जात होती, ज्यामुळे परिसरातील पर्यावरण धोक्यात आले होते. या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यापूर्वी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीला काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला बगल देत कंपनीमध्ये उत्पादन सुरूच असल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत आता संबंधित यंत्रणांनी अधिक कडक भूमिका घेतली आहे.
कंपनीला आता पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व उत्पादन प्रक्रिया तत्काळ थांबवावी लागणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींची पूर्तता करणे, सुरक्षेचे सर्व उपाय योजणे आणि पर्यावरणाचे नियम पाळणे या बाबी पूर्ण केल्यानंतरच कंपनीबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या कारवाईमुळे कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील उद्योगांमध्ये खळबळ उडाली असून, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर आता प्रशासनाचा वचक निर्माण झाला आहे.