सांगली : वेदांत बंडगर खून प्रकरणात मुख्य सुत्रधार नीलेश गडदे याला प्रोत्साहन देणारा कुख्यात गुंड म्हमद्या उर्फ महम्मद जमाल नदाफ (वय ४४, रा. संजयनगर) याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवाळल्या. गुन्ह्यातील काही संशयित आरोपी अद्याप पसार असल्याने पोलिस कोठडीचे अधिकार ठेवत न्यायालयाच्या परवानगीने कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. म्हमद्याच्या सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्याला आता वेगळे वळण लागले आहे.
दरम्यान, सुत्रधार गडदे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला पिस्तूल पुरवणारा मलीक शेख याचा कारागृहातून ताबा घेतला जाणार आहे. गडदेसह संदेश घागरे, अतुल वायदंडे यांना यापुर्वी अटक करण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले पसार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सागर चौगुले हा नजरकैदेत आहे.
पोलिसांनी सांगितले की, मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटांत वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे, म्हणून संशयित नीलेश गडदे दबाव आणत होता. १० जून रोजी रात्री सातला गडदे दोन साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त झाला. त्यानंतर पोलिसांनी गडदेसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी म्हमद्या नदाफ याचे नाव पुढे आले. त्याने गडदे याला या गुन्ह्यात प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांनी तातडीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला आज अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
म्हमद्यावर वीस गुन्हे दाखल
म्हमद्या नदाफ याच्यावर वीस गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात तीन खुनाचे गुन्हे दाखल असून गोळीबार, अवैध शस्त्र बाळगणे, धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. गोळीबार प्रकरणातून नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता. दर सोमवार आणि गुरूवारी त्याला शहर पोलिस ठाण्यात हजरीसाठी जावे लागत होते. आता या गुन्ह्यातही त्याचे नाव समोर आले आहे.
म्हमद्याशी हात मिळवणी
गुंड नीलेश गडदे हा जत तालुक्यातील बाज येथील आहे. त्या तालुक्यात कुख्यात गुंड मधुकर ऊर्फ ‘मध्या’ दादासो वाघमोडे हा देखील आहे. दोघांचेही एकमेकांशी कायमचे वैर आहे. त्यातून गडदे याने म्हमद्याशी हातमिळवणी केली होती, अशी चर्चा सुरू आहे. ...