फिनटेक : 'एनव्हिडिया'ची नवी उडी
esakal June 22, 2026 11:45 AM

अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्‍लेषक

अलीकडेच आलेल्या ताज्या बातमीनुसार ‘एआय’ आणि ग्राफिक्स क्षेत्रात आघाडीवर असणारी एनव्हिडिया कंपनी आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी लॅपटॉप बाजारपेठेमध्ये उतरणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांनी तैवानमधील ‘कॉम्प्युटिक्स’ तंत्रज्ञान प्रदर्शनात एका नव्या ‘सुपरचिप’ची घोषणा केली आहे. या चिपचे नाव ‘आरटीएक्स स्पार्क’ असे असेल. आतापर्यंत एनव्हिडिया प्रामुख्याने एआय सर्व्हर आणि व्हिडीओ गेमसाठी लागणारे महागडे ग्राफिक कार्ड (जीपीयू) बनविण्यासाठी ओळखली जायची. संगणकाचे कामकाज चालवत असलेले सीपीयू इंटेल, एएमडी अशा कंपन्या तयार करतात. आता या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी एनव्हिडिया कंपनीने कॉम्प्युटरच्या मुख्य मेंदूमध्ये, म्हणजेच प्रोसेसर क्षेत्रात प्रवेश केला आहे.

आरटीएक्स स्पार्क हे एक ‘सिस्टीम-ऑन-चिप’ प्रकारचे तंत्रज्ञान असेल. त्यात सीपीयू आणि जीपीयू एकमेकांना जोडले जातील. यामुळे लॅपटॉपमध्ये एआय सॉफ्टवेअर आणि क्लिष्ट ग्राफिक्स यांचे काम अत्यंत वेगाने होऊ शकेल. ही चिप ‘आर्म’ या ऊर्जा-बचत करणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे लॅपटॉपची बॅटरी जास्त वेळ टिकेल, असा दावा कंपनीने केला आहे. साहजिकच यामुळे ‘एनव्हिडिया’ थेट इंटेल, एएमडी आणि क्वालकॉम यांच्यासारख्या बलाढ्य कंपन्यांना टक्कर देणार आहे. आगामी काळात लेनोवो, एचपी आणि डेल यांसारख्या जगातील दोन-तृतीयांश बाजारपेठ व्यापलेल्या कंपन्या ‘एनव्हिडिया’च्या या चिप वापरून नव्या लॅपटॉप बाजारात आणणार आहेत.

काही तज्ज्ञांच्या मते ‘एनव्हिडिया’साठी हे आव्हान सोपे नसेल. यापूर्वी कंपनीने ‘टेग्रा’ या चिपद्वारे या बाजारात उतरण्याचा प्रयत्न केला होता; पण ही चिप वापरू शकेल अशा प्रकारचे सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यामुळे तो प्रयोग फारसा यशस्वी ठरला नव्हता. त्यामुळे, नव्या ‘आरटीएक्स स्पार्क’ चिप ग्राहकांच्या पसंतीस उतरते का आणि भारी कामे करताना बॅटरीचा वापर खरोखरच कमी राखू शकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्थात, ‘एनव्हिडिया’चे वैशिष्टय म्हणजे आपल्या चुकांमधून लगेच धडा घेऊन पुढच्या वेळी अतिशय जोमाने आणि नियोजनबद्धरीत्या कंपनी नव्याने बाजारात उतरत असल्याचा इतिहास. यामुळे यंदा कदाचित तिला जोरदार यश मिळू शकेल. साहजिकच आधीच शेअर बाजारात तिने निर्माण केलेली एकाधिकारशाही आणखी टोकाला जाऊ शकेल.

अमेरिकी शेअर बाजार, तंत्रज्ञान क्षेत्र, चिप उद्योग अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत असलेल्या लोकांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. याचे दूरगामी पडसाद उमटण्याची दाट शक्यता निश्चितच आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.