सामंत-महाजनांनी समोर बसवून माघार घ्यायला लावली, 'त्या' प्रकरणावरुन कारवाईची भीती, पण गोकुळ गीतेंनी हवं ते केलंच
अनिरुद्ध जोशी June 22, 2026 01:13 PM

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर राजकीय भूकंपाची नोंद झाली आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी महायुतीच्या अत्यंत वरिष्ठ नेत्यांनी ज्यांची माघार ठरवली होती, त्या भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवून गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय संपादित केला आहे. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला असून नरेंद्र दराडे (Narendra Darade) पराभव स्वीकारून मतमोजणी केंद्रावरून निघून गेले आहेत.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: सामंत-महाजनांची मनधरणी 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठे राजकीय नाट्य रंगले होते. शिवसेनेचे संकटमोचक मानले जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी गीते बंधूंच्या निवासस्थानी धाव घेतली होती. या दोन्ही दिग्गज मंत्र्यांनी गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोकुळ गीतेंनी माघार घेतली होती. त्या बैठकीवेळी गोकुळ गीते यांच्या चेहऱ्यावरील नाराजी आणि देहबोली बरेच काही सांगून जात होती. ज्येष्ठ मंत्र्यांचा शब्द राखण्यासाठी त्यांनी जाहीरपणे प्रचार थांबवण्याची तयारी दर्शवली असली, तरी मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते. आज मतमोजणी केंद्रावर येत, "मी कधीही माघार घेतली नव्हती, तो शब्द वापरू नका," असा घुमजाव करत गीतेंनी महायुतीची झोप उडवली होती.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: 'त्या' म्हाडा प्रकरणावरून कारवाईची भीती 

गोकुळ गीते यांच्या या माघारीमागे केवळ राजकीय मनधरणी नव्हती, तर पडद्यामागे 'दबाव तंत्र' वापरले गेल्याची मोठी चर्चा होती. गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना नाशिकमधील एका 'म्हाडा' प्रकरणात उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेष म्हणजे, गोकुळ गीते यांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच दिवशी हे पत्र समोर आणण्यात आले होते. या कायदेशीर कारवाईच्या भीतीचा आणि मंत्र्यांच्या दबावाचा वापर करून गोकुळ गीते यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली होती. परंतु, हा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट केले आहे.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: महायुतीला मोठा धक्का

आज सकाळी मतमोजणी सुरू असताना मतमोजणी कक्षात आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीवरून मोठा गोंधळ उडाला होता. गीते आणि दराडे समर्थक आमनेसामने आले होते. मात्र, कायदेशीर लढाईत वकिलांना बोलावून गोकुळ गीतेंनी आपला आक्षेप लावून धरला. प्रशासकीय शंका निरसनानंतर जेव्हा मतमोजणी सुरू झाली, तेव्हा पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी 150 पैकी 100 हून अधिक मते घेत मोठी आघाडी घेतली. एकूण 618 मतदारांपैकी 13 मते अवैध ठरली, तर 605 वैध मतांच्या आधारे विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित होता. गोकुळ गीते यांनी 357 मते मिळवून एकतर्फी विजय मिळवला, तर नरेंद्र दराडे यांना 248 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. 

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधान परिषद निवडणूक अंतिम निकाल

नाशिक एकूण मतदान - 618

अवैध मतदान - 13

वैध मतदान - 605

फायनल कोटा - 303

अपक्ष गोकुळ गीते - 357

शिवसेना नरेंद्र दराडे - 248

आणखी वाचा 

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: उदय सामंत-महाजनांनी ताकद पुरवली, तरी गोकुळ गितेंनी नरेंद्र दराडेंचा गेम केला, निकाल लागताच पडलेल्या चेहऱ्याने बाहेर येऊन म्हणाले...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.