Nashik Vidhan Parishad Election Result 2026: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अत्यंत धक्कादायक निकाल लागला आहे. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवून गोकुळ गीते यांनी नाशिकच्या गडात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या धक्कादायक पराभवामुळे महायुतीला मोठा झटका बसला असून या विजयानंतर गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांनी दराडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला.
निवडणुकीच्या पडद्यामागील घडामोडींवर आणि स्वतःच्या माघारीवर बोलताना गणेश गीते यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली. गणेश गीते म्हणाले की, "आम्ही छुप्या पद्धतीने यंत्रणा राबवली नाही. मी या निवडणुकीच्या प्रक्रियेतून माघारीच्या शेवटच्या दिवशी तीन तारखेला बाजूला झालो होतो. ही जागा शिवसेनेला सुटल्याने मी पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीतून माघार घेतली होती."
नरेंद्र दराडे यांच्या पराभवाचे विश्लेषण करताना गणेश गीते यांनी मतदारांमधील रोष आणि दराडे यांच्या जनसंपर्काचा अभाव यावर घणाघाती टीका केली. गणेश गीते म्हणाले की, "पहिल्या दिवसापासून शिवसेनेच्या उमेदवारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष होता. त्यामुळे मतदारांनी कौल गोकुळ गीतेंना दिला. कोणाचा बाप काढणे ही दराडेंची संस्कृती आहे, आम्ही कोणाचा बाप काढलेला नाही, लोकांनी गोकुळ गीतेंना भरभरून न्याय दिलेला आहे," असे त्यांनी म्हटले. तसेच, "आठ वर्षांपूर्वी दराडे निवडून आले, त्यानंतर त्यांनी कोणाशीही संपर्क ठेवला नाही. कोणाच्या सुखदुःखात कधी गेले नाहीत. कोणाच्या कामात पण आले नाही. त्यामुळे जनता निश्चितपणे अशा उमेदवाराला नाकारते," असे म्हणत गणेश गीते यांनी नरेंद्र दराडेंवर हल्लाबोल केला.
दरम्यान, गोकुळ गीते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तुमची राजकीय भूमिका काय राहणार? याबाबत विचारले असता गणेश गीते म्हणाले की, "मी माझ्या घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते की, यापुढे तो त्याचा कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो. मी त्याला ती मुभा दिलेली आहे. त्यामुळे आता कुठे जायचे आणि कुठे थांबायचे हा निर्णय तो घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले. तर, "मी भारतीय जनता पक्षातच असणार आहे. मी गिरीश भाऊंसोबतच कायम राहणार आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक एकूण मतदान - 618
अवैध मतदान - 13
वैध मतदान - 605
फायनल कोटा - 303
अपक्ष गोकुळ गीते - 357
शिवसेना नरेंद्र दराडे - 248
निकाल - गोकुळ गीते विजयी
आणखी वाचा