वाशीत पुनर्विकास प्रकल्पातील मिक्सर ट्रक गृहनिर्माण संकुलात घुसला
अरुंद रस्त्यांचा धोका पुन्हा चव्हाट्यावर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : वाशी सेक्टर ९ येथे एका पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकाम साईटवरून निघालेला काँक्रीट मिक्सर ट्रक अनियंत्रित होऊन थेट शेजारील जेएन-४ गृहनिर्माण संकुलात घुसल्याची घटना सोमवारी (ता. २२) घडली. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे वाशीतील दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मिक्सर ट्रक माजी जेएन-२ वसाहतीच्या ठिकाणाहून निघाला होता. अत्यंत अरुंद असलेल्या रस्त्यावरून ट्रक मागे घेत चढावर आणण्याचा प्रयत्न चालक करत होता. याच वेळी ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो थेट शेजारील जेएन-४ संकुलात जाऊन धडकला. हा पुनर्विकास प्रकल्प गोदरेज प्रॉपर्टीज या बांधकाम कंपनीकडून राबविण्यात येत आहे. जेएन-४ गृहनिर्माण संस्थेचे सचिव विनय तलाटी यांनी माहिती देताना सांगितले की, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, हा रस्ता अत्यंत अरुंद असून, येथे बांधकामाशी संबंधित अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक रहिवासी विभा स्युनरी यांनी आपली भीती व्यक्त करताना सांगितले की, माझे स्वयंपाकघर या रस्त्याकडे असल्याने अवजड वाहनांची वर्दळ पाहून मला नेहमीच भीती वाटायची. या रस्त्यावरून अशी वाहने जाताना पाहिले की काहीतरी अनर्थ घडेल, अशी धाकधूक नेहमी असायची. पर्यावरण कार्यकर्ते आणि ह्युमन चेन ऑनलाइन मंचाचे समन्वयक बी. एन. कुमार यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अवजड बांधकाम वाहनांसाठी पुरेशी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वस्वी विकासकांची जबाबदारी आहे. जिथे आवश्यक असेल तिथे विकासकांनी रस्ते रुंद करावेत आणि नागरी प्रशासनानेही सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करावी. अन्यथा अशा प्रकारचे जीवघेणे अपघात इतर पुनर्विकास प्रकल्पांच्या ठिकाणीही घडू शकतात.