IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन
esakal June 22, 2026 11:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा (IPL 2026) काही दिवसांपूर्वीच संपली. या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये ५ वेळच्या मुंबई इंडियन्सचाही (Mumbai Indians) समावेश आहे. मुंबई संघाने अनेक अनुभवी खेळाडू असतानाही त्यांना यंदा ९ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईने केवळ १४ पैकी ४ सामने यंदाच्या जिंकले. या हंगामादरम्यान मुंबईच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचीही चर्चा होती. याशिवाय हार्दिक पांड्याबाबतही (Hardik Pandya) संघात नाराजी असल्याचे रिपोर्ट्स होते. आता नवे रिपोर्ट्स समोर येत आहेत.

IPL 2027 TRADE: हार्दिक पांड्याचं नाव, पण रोहित शर्माचा करेक्ट कार्यक्रम! Mumbai Indians ट्रेड विंडोत मोठा डाव टाकायला तयार; वाचा Inside Story

मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्याला ट्रेड (Trade) करण्याचा मुंबई इंडियन्स विचार करत आहेत. २०२४ मध्ये मुंबईने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून ट्रेडिंगमध्येच पुन्हा संघात घेतलं होतं. हार्दिकने २०१५ ते २०२१ पर्यंत मुंबईसाठी आयपीएल खेळल्यानंतर २०२२ आणि २०२३ हंगाम तो गुजरात टायटन्सकडून कर्णधार म्हणून खेळला.

विशेष म्हणजे त्याच्या नेतृत्वात गुजरातने सलग दोन्ही वर्षी अंतिम सामनाही गाठला. २०२२ मध्ये विजेतेपद मिळवलं, तर २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळवले. मात्र २०२४ मध्ये तो मुंबईचा कर्णधार झाला. मात्र मुंबईची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही.

अशी चर्चा होती की हार्दिक आयपीएल २०२७ स्पर्धेसाठी नव्या संघाच्या शोधात आहे. चेन्नई सुपर किंग्स त्याला संघात घेऊ शकतात, अशी चर्चा होती. तथापि, केवळ चेन्नईच नाही, तर राजस्थान रॉयल्सही हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समोर आले आहे. त्याला यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) बदल्यात ट्रेड केले जाऊ शकते.

रोहित शर्मा आता त्याच्या कारकि‍र्दीच्या उत्तरार्धात आहे, अशात मुंबई भविष्याच्यादृष्टीने जैस्वालचा विचार करण्याची दाट शक्यता आहे. जैस्वाल २०२० पासून राजस्थानसोबत आहे.

पण रियान पराग आणि वैभव सूर्यवंशीचा संघातील वाढता प्रभाव पाहाता, जैस्वालही मुंबईच्या संघात जाऊ शकतो. तो देशांतर्गत क्रिकेटही मुंबईकडून खेळत असल्याने मुंबईच्या घरच्या मैदानातील वानखेडे स्टेडियमलाही तो चांगला ओळखतो.

मुंबईला मिळणार नवा कर्णधार

दरम्यान, मुंबई पुढच्यावर्षी नेतृत्वबदलही करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईचे सर्वात यशस्वी नेतृत्व रोहित शर्माने (Rohit Sharma) केले आहे. त्याच्याइतके यश दुसऱ्या कर्णधाराला मुंबईसाठी मिळालेले नाही. मात्र रोहित आता पुन्हा मुंबईचा कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे.

तसेच सूर्यकुमार यादवनेही वयाची पस्तीशी पार केली आहे आणि खराब फॉर्ममुळे भारताच्या टी२० संघातील स्थानही गमावली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतींची जोखीम टाळण्यासाठी वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे.

अशात मुंबई इंडियन्स २३ वर्षीय तिलक वर्मावर (Tilak Varma) कर्णधार म्हणून विश्वास दाखवू शकतात. तिलक रोहितचा जवळचा खेळाडू असल्याचेही म्हटले जाते. इतकेच नाही, तर बीसीसीआयकडूनही त्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला जात आहे.

सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या अन् Mumbai Indians यांच्या नेमकं काय सुरू आहे? जाणून घ्या Inside Story, सूर्या टीमसोबत राहणार का?

नुकतेच श्रीलंकेत भारतीय अ संघाने तिलक वर्माच्या नेतृत्वात तिरंगी वनडे मालिका जिंकली आहे. या मालिकेत तिलकची कामगिरीही चांगली झाली. त्याने भारतीय अ संघासाठी सर्वाधिक २७५ धावा केल्या. इतकेच नाही, तर तिलक वर्माला भारताच्या टी२० संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. तिलककडे हैदराबाद संघाचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता तिलककडे मुंबई नवा कर्णधार म्हणून पाहण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, हे सर्व रिपोर्ट्स असले, तरी अद्याप मुंबई इंडियन्सकडून किंवा कोणत्याही खेळाडूकडून याबाबत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे आता या चर्चा किती खऱ्या ठरणार याचे चित्र पुढच्या वर्षीपर्यंत स्पष्ट होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.