उमरगा - माजी मंत्री, लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बसवराज पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी आपल्या अफाट जनसंपर्क आणि राजकीय कौशल्याच्या जोरावर चोख उत्तर दिले आहे. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर 'महायुती'च्या ठरलेल्या कोट्यापेक्षा अधिकची मते खेचून आणत विरोधकांना चकित केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले असून, मराठवाड्याच्या राजकारणात त्यांची पुन्हा एकदा दमदार एन्ट्री झाली आहे.
श्री. पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने सुरुवातीला त्यांच्यावर लातूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यावेळी 'एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला मोठे पद मिळायला हवे होते. असे विरोधक अप्रत्यक्ष बोलले होते. परंतु कालांतराने केंद्रीय व राज्यातील नेतृत्व त्यांच्या अनुभवाचा सन्मान करणार, हा विश्वास फोल ठरला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली.
संधीचे सोनं करत 'जादा' मतांची केली कमाई!
पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचे पाटील यांनी पूर्णपणे सोनं केले. या निवडणुकीत त्यांनी केवळ महायुतीची मतेच सुरक्षित ठेवली, तर आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करत महाविकास आघाडीतील काही मतदार आणि अपक्ष मतदाराची मतेही आपल्या पारड्यात पाडून घेतली. महायुतीच्या संख्याबळापेक्षा जास्त, तसेच विविध आघाडी व अपक्षांचे मते अधिक मिळवत त्यांनी मिळवलेला हा विजय त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची पावती देणारा ठरला आहे.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दांडगा अनुभव
बसवराज पाटील यांची ओळख केवळ एका पक्षाचे नेते म्हणून नाही, तर मराठवाडा आणि कर्नाटक सीमाभागातील एक बहुआयामी आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून आहे. त्यांनी यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा या दोन्ही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांचे यशस्वी प्रतिनिधित्व केले आहे. आमदार आणि राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर नेहमीच आक्रमक व सकारात्मक काम केले. सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले जाळे आजही ग्रामीण भागातील जनतेला आधार देत आहे. दरम्यान गेल्या अडीच वर्षांत पाटील यांनी शांत न बसता पक्षाच्या वाढीसाठी कष्ट घेतले. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
श्री. पाटील यांच्या या दणदणीत विजयामुळे उमरगा, लोहारा, औसा आणि संपूर्ण लातूर-धाराशिव जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्यामुळे आता या भागातील प्रलंबित विकासकामांना, सिंचनाच्या प्रश्नांना आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास जनतेमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान मुरुमचे नगराध्यक्ष बापूराव पाटील, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद- शेतरस्ते समितीचे सहअध्यक्ष शरण पाटील, जेष्ठ नेते रामकृष्णपंत खरोसेकर, विठ्ठलराव बदोले, ॲड. व्ही. एस. आळंगे, विजयकुमार सोनवणे, मल्लीनाथ दंडगे, अनिल उर्फ पप्पू सगर, सुनील कुलकर्णी, सतीश सुरवसे, चंद्रशेखर पवार, पंकज खरोसेकर, रफिक तांबोळी, योगेश राठोड, महेश माशाळकर, महालिंग बाबशेट्टी, उल्हास घूरघूरे, शंकरराव पाटील आदी कार्यकर्त्यांनी श्री. पाटील यांच्या विजयाचा जल्लोष केला.