लखनौच्या आगीत 15 जणांचा मृत्यू
Marathi June 23, 2026 01:25 PM

गेमिंग झोन असलेल्या बहुमजली इमारतीला आग : ‘एसी’तील शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या अलिगंज परिसरात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. पहिल्या मजल्यावरील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागून 15 जणांचा मृत्यू झाला. या अग्नितांडवात इमारत जळून पूर्णपणे खाक झाली आहे. बहुमजली इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण इमारत धूर आणि आगीच्या ज्वाळांमध्ये पसरली. प्रथमदर्शनी, ही आग एसीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राजधानी लखनौच्या अलिगंज भागातील एका गेमिंग झोनला भरदुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागताच परिसरात घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले. गेमिंग झोनच्या खाली एक पाळीव प्राण्यांचे दुकान आणि पशुवैद्यकीय दवाखाना होता. त्यातील प्राणीही आगीत दगावले आहेत. आग लागल्यानंतर गेमिंग झोनमध्ये असलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली. आग वेगाने पसरली आणि कार्यालयाला वेढले. त्यावेळी कार्यालयात 30 हून अधिक लोक उपस्थित होते. आग लागताच घबराट पसरली.

बचावासाठी काहींनी बाथरूमचा आश्रय घेतला. तर काही लोकांनी पहिल्या मजल्यावरून थेट रस्त्यावर उड्या मारल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अपघातादरम्यान एक हृदयद्रावक दृश्यही समोर आले आहे, ज्यात एक व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी ग्रील पकडताना दिसत आहे, परंतु भीषण आगीमुळे तो इमारतीवरून थेट संरक्षक कठड्यावरील लोखंडी सळ्यांवर कोसळल्याचे दिसत आहे. इमारतीमधील कामगार आणि इतर लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न दिसल्याने, त्यांनी जवळच्या तारेवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला आगीच्या घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार एक कोचिंग सेंटर आणि एक ग्रंथालय असल्याचे सूचित झाले होते, परंतु वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या इमारतीत कोणतेही कोचिंग सेंटर किंवा ग्रंथालय कार्यरत नव्हते असे सांगितले. तळमजल्यावर एक पाळीव प्राण्यांचे दुकान होते, तर वरच्या मजल्यावर एक गेमिंग झोन कार्यरत होता. त्याठिकाणी कर्मचारी गेमिंग सॉफ्टवेअरवर काम करत होते असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रशासकीय हालचालींना वेग

या भीषण आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची पथके आग विझवण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचावकार्य सुरू केल्यानंतर जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले सर्व दौरे रद्द केले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हेदेखील तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले होते. पोलीस महासंचालकांनी (डीजीपी) घटनास्थळ गाठत सर्व घटनेचा आढावा घेतला. तसेच मदत व बचावकार्यावरही त्यांनी पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले होते.

लखनौ शहरात शोककळा पसरली आहे

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात सोमवारी लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहराला धक्का बसला आहे. या दु:खद घटनेत जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांचे वय अंदाजे 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबांशी संवाद साधून सर्वतोपरी मदत करण्याचे, तसेच जखमींवर योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक तातडीने घटनास्थळी

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशीही संवाद साधला. ‘सध्या वरच्या मजल्यावर कोणीही नाही. कामगारांनी पहिल्या मजल्याची भिंत तोडून आत प्रवेश केला आहे. परिसरात खूप धूर आहे. प्रत्येक खोलीची तपासणी केली जात आहे. सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे आमचे प्राधान्य आहे. सर्व प्रशासकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.