केतनला जिथून ढकललं, तो लोहगडावरील हादरवणारा स्पॉट; 350 मीटर खोल कडा अन् खतरनाक स्लोप; केतन पाठीमागे वळून फोटो काढण्यात मग्न असतानाच...
अंकिता खाणे June 24, 2026 03:13 PM

लोणावळा/पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याच्या खळबळजनक हत्याकांडात आता पोलिसांच्या एफआयआर (FIR) कॉपीमधून आणि थेट लोहगड किल्ल्यावरील घटनास्थळावरून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला 'वाढदिवसाचे सेलिब्रेशन आणि सेल्फी' घेताना झालेला अपघात असल्याचा बनाव मुख्य आरोपी आणि भावी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) हिने रचला होता. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळाची भीषणता आणि केतनने वडिलांकडे व्यक्त केलेला संशय पाहता, हा अत्यंत थंड डोक्याने रचलेला सुनियोजित कट होता हे आता स्पष्ट झाले आहे. (Ketan Agrawal)

Ketan Agrawal Death :  'तो' धोकादायक कडा आणि सियाचा खोटा ड्रामा

लोहगड किल्ल्यावरील 'हत्ती तलावा'च्या बाजूने जाणाऱ्या एका अरुंद रस्त्यावर हा अतिशय धोकादायक कडा (डेंजर स्लोप) आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने वेढलेला असला, तरी येथील दरी अत्यंत भयानक आणि खोल आहे. याच कड्यावर १८ जून रोजी सिया केतनला घेऊन आली होती. कड्याच्या टोकावर केतन पाठीमागे वळून फोटो काढण्यात मग्न असताना, दबा धरून बसलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी पाठीमागून आला आणि त्याने केतनला थेट ३५० मीटर खोल दरीत ढकलून दिले. केतन दरीत कोसळताच चेतन तिथून पसार झाला, तर सियाने तिथे उपस्थित पर्यटक आणि सुरक्षा रक्षकांसमोर 'माझा मित्र खाली पडला, वाचवा!' असा जोरात ओरडत खोटा ड्रामा सुरू केला. रेस्क्यू टीमने अत्यंत खडतर प्रयत्नांनंतर केतनला बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ज्या ठिकाणाहून केतन खाली पडला ते ठिकाण अगदी अरुंद रस्त्यावर आहे, हा अतिशय धोकादायक कडा आहे, त्यांनी आधी किल्ल्यावर गेल्यानंतर ती जागा ठरवली का? अशी चर्चा देखील सुरू आहे. त्या ठिकाणची खोली मोठ्या प्रमाणावर आहे, 

Ketan Agrawal Death :  साखरपुड्यापासूनच केतनला होता संशय!

केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमधून दोन्ही कुटुंबांमधील अंतर्गत वादाचे मोठे गुपित समोर आले आहे.
फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाल्यापासूनच केतनला सियाच्या वागण्याचा संशय येत होता. "तुम्ही सियाची नीट चौकशी केली आहे का?" असा प्रश्न केतन वारंवार आपल्या वडिलांना विचारत होता. सिया अतिशय किरकोळ आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून केतनशी वाद घालायची आणि भांडण करायची. केतनने याबद्दल वडिलांकडे तक्रारही केली होती, परंतु नात्यात असे वाद होतात, असे म्हणून वडिलांनी तेव्हा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. सियाच्या बोलण्यात सातत्याने 'चेतन चौधरी' नावाच्या तरुणाचा उल्लेख असायचा. चेतन आणि सियाचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते आणि केतन त्यांच्यात अडथळा ठरत होता.

Ketan Agrawal Death : लोहगड किल्ल्यावरच येण्याचा 'ती' वारंवार का करायची हट्ट?

तपासात आणि वडिलांच्या दाव्यानुसार, सिया केतनला वारंवार लोहगड किल्ल्यावरच घेऊन जात होती आणि तिथूनच हत्येचा कट पूर्ण करायचा हे तिने आधीच ठरवले होते. यापूर्वीही सियाने केतनला दोन वेळा याच लोहगड किल्ल्यावर आणले होते. जेव्हा केतनने किल्ल्यावर येण्यास नकार दिला, तेव्हा तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. तिसऱ्यांदा, म्हणजेच १८ जून रोजी, तिने "१९ जूनला माझा वाढदिवस आहे, मला वाढदिवसाचे सेलिब्रेशन लोहगडावरच करायचे आहे" अशी अत्यंत जिद्द आणि हट्ट करून केतनला मृत्यूच्या सापळ्यात ओढून आणले होते.

Ketan Agrawal Death :  ...अन् अखेर नवरीचा काळा चेहरा समोर आला!

केतनचा पाय घसरून पडणे अशक्य असल्याचे समजताच वडिलांनी पोलिसांना सियाच्या संशयास्पद वागण्याची माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही फुटेज आणि चेतन-सियाचा सीडीआर (Call Detail Records) तपासला, तेव्हा वाढदिवसाच्या दिवशी चेतन चौधरी तिथे हजर असल्याचे आणि हा अपघात नसून पूर्ण तयारीनिशी केलेली हत्या असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Ketan Agrawal death : केतनला संपवण्यासाठी दोघांचाही खटाटोप

- फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला आणि सियाने लग्न तोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले
- भेटी-गाठी, फिरण्याच्या बहाण्याने भांडणं सुरु
- सियाची आपण संपूर्ण माहिती घेतली का? केतनची वडिलांची पहिल्यांदा विचारणा
- केतनला ट्रेकिंगची आवड असल्यानं लोहगडावर हत्या करण्याचा कट रचला
- पहिल्यांदा 30 मे ला लोहगडावर जाण्याचा आग्रह
- 31 मे ला लोहगडावर घेऊन जाण्यात यश. पहिल्या ट्रेकिंगला रेकी आणि विश्वास संपादन केलं
- 6 जूनला बालीला प्री वेडिंग शूटला जाण्यापूर्वी 4 जूनला लोहगडावर हत्या करण्याचं ठरलं. पण चार दिवसांपूर्वी जाऊन आल्याचं कारण देत लोहगडावर जाणं टाळलं. सियाचा पहिला प्रयत्न फसला
- 6 जूनला बालीला जाण्यासाठी मुंबईला निघाले. फुडमॉलवर गाडी थांबली, काही कारण सांगून सिया गाडीकडे गेली, केतनच्या बॅगेतून पासपोर्ट काढला आणि तो फाडून टॉयलेटच्या फ्लशमध्ये टाकला. मुंबई विमानतळावर केतनचा पासपोर्ट गायब झाल्याचं समजलं, प्री वेडिंग शूट रद्द 
- सियाची वडिलांकडे तक्रार, महिनाभरापासून भांडण आणि त्रास देते. ती वयाने लहान असल्याचं सांगत वडिलांनी केतनकडे पुन्हा दुर्लक्ष केलं.
- 4 जूनला लोहगडावर आला नाही, म्हणून कडाक्याचे भांडण केलं आणि 14 जूनला लोहगडावर जाण्याचा सियाने हट्ट धरला. वडिलांनी नाईलाजास्तव परवानगी दिली. ते लोहगडावर गेले. साप आला, साप आला असं नाटक करुन सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. हत्येचा दुसरा प्रयत्न अयशस्वी ठरला
- सियाची आपण सर्व माहिती घेतलीये का? सियाचा फोन नेहमी बिझी असतो? भेटल्यावर मित्र चेतन चौधरीचा उल्लेख वेळोवेळी करते. तिचे बाहेर प्रेमसंबंध आहेत का? केतनने वडिलांकडे पुन्हा शंका उपस्थित केल्या. पण वडील, काका आणि बहिणीने केतनची नेहमीप्रमाणे समजूत काढली.
- 17 जूनला सियाने व्हाट्सएपवरुन केतन कॉल केला. 19 जूनला माझा बर्थडे आहे, आपण 18 जूनला त्यानिमित्ताने लोहगडावर ट्रेकिंगला जाऊ. पण केतनने नाकारले, तरी तिने हट्ट धरला. मग केतनच्या आईने सियाला नकार कळवला. तरी सियाने हट्ट कायम ठेवला. मग सरतेशेवटी वाढदिवसानिमित्त तिला नाराज करायला नको, म्हणून लोहगडावर जाण्याची परवानगी देण्यात आली. तो दिवस मात्र केतनचा शेवटचा ठरला.

Ketan Agrawal death : सियाने हत्येचा कट गुगल वर सर्च केला? सूत्रांची माहिती

केतन अगरवालच्या हत्येचा कट सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी रचला. पण सियाने हा कट गुगल वर सर्च करुन शिजवला, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. तिच्या मोबाईलमध्ये त्या अनुषंगाने काही पुरावे आढळले आहेत, सूत्रांनी तशी माहिती दिलीये. गुगल वरुन घेतलेल्या माहितीच्या आधारे केतनची हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय, असं ही सूत्रांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.