इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
जयदीप मेढे June 24, 2026 04:43 PM

A video showing ants inside an ethanol fuel tank: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इथेनॉल इंधनाबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. मंत्रालयाने सांगितले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे ही प्रक्रिया पूर्णपणे वैज्ञानिक असून त्यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. अलीकडेच, वाहनाच्या इंधन टाकीजवळ मुंग्या दिसत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, फ्यूल-ग्रेड इथेनॉलमध्ये साखर नसते.

अशा चिंता निराधार आहेत

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काही लोक सोशल मीडियावर जुने व्हिडिओ आणि फोटो पुन्हा शेअर करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. सरकारने सांगितले की, ई20 पेट्रोल वापरल्यानंतर इंजिन खराब झाल्याची कोणतीही तक्रार अद्याप समोर आलेली नाही. केंद्र सरकारने ई 20 पेट्रोलच्या (20 टक्के इथेनॉल फ्लेक्स फ्यूल) वापरामुळे वाहन विम्याच्या वैधतेवर कोणताही परिणाम होत नाही. अशा चिंता निराधार आहेत आणि संबंधित हितधारकांशी चर्चा केल्यानंतर त्या फेटाळण्यात आल्या आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, अमेरिका, ब्राझील आणि जपानसारख्या देशांमध्ये इथेनॉल-मिश्रित इंधनाचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. ब्राझीलमध्ये, E27 चा इंधन म्हणून बऱ्याच काळापासून वापर केला जात आहे.

सरकारने इथेनॉल वापराचे तीन फायदे सांगितले

सरकारने सांगितले की, इथेनॉल कार्यक्रमाने कच्च्या तेलाची आयात कमी केली आहे. यामुळे देशाला आतापर्यंत 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन वाचविण्यात मदत झाली आहे. सरकारने सांगितले की, इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कृषी उत्पादनांच्या वाढलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आधार मिळाला आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. इथेनॉल इंधन देशाची ऊर्जा सुरक्षा वाढविण्यात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करत असल्याचे म्हटलं आहे. 

इथेनॉल म्हणजे काय?

  • इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे जो स्टार्च आणि साखरेच्या फर्मेंटेशन प्रक्रियेतून तयार होतो. ते गॅसोलीनमध्ये मिसळून वाहनांमध्ये पर्यावरणपूरक इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉल प्रामुख्याने उसाच्या रसापासून तयार केले जाते, परंतु मका, सडलेले बटाटे, कसावा आणि सडलेल्या भाज्या यांसारख्या स्टार्चयुक्त पदार्थांचाही वापर केला जाऊ शकतो.
  • पहिल्या पिढीचे इथेनॉल: पहिल्या पिढीचे इथेनॉल उसाचा रस, गोड बीट, सडलेले बटाटे, गोड ज्वारी आणि मका यांपासून तयार केले जाते.
  • दुसऱ्या पिढीचे इथेनॉल: दुसऱ्या पिढीचे इथेनॉल तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मक्याचे कणीस, बांबू आणि लाकडी बायोमास यांसारख्या सेल्युलोज आणि लिग्नोसेल्युलोजिक पदार्थांपासून तयार केले जाते.
  • तिसऱ्या पिढीचे इथेनॉल : तिसऱ्या पिढीचे जैवइंधन शेवाळापासून बनवले जाईल. यावर सध्या काम सुरू आहे.

15 दिवसांपूर्वी E85 इंधन सादर, सरकारचे लक्ष जैवइंधनावर

15 दिवसांपूर्वी, सरकारने फ्लेक्स-फ्यूएल वाहनांसाठी E85 इंधन सादर केले. दिल्लीमध्ये E85 इंधनाची किंमत ₹82.12 प्रति लिटर निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत दिल्लीत विकल्या जाणाऱ्या नेहमीच्या E20 पेट्रोलपेक्षा तब्बल ₹20 ने कमी आहे. हे इंधन 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल आणि 15 टक्के पेट्रोल यांचे मिश्रण आहे. आता 100 टक्के इथेनॉलला मंजुरी मिळाल्याने देशातील हरित ऊर्जा आणि जैवइंधन क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. सध्या, बाजारात चार प्रकारचे फ्लेक्स-फ्यूएल उपलब्ध आहेत.

केवळ या निवडक वाहनांमध्येच वापरले जाऊ शकते

E85 इंधन नेहमीच्या पेट्रोल वाहनांमध्ये वापरले जाऊ शकत नाही. यासाठी, वाहनाचे इंजिन विशेषतः 'फ्लेक्स-फ्यूएल' तंत्रज्ञानावर आधारित असणे आवश्यक आहे.

  • मारुती सुझुकी वॅगनआर फ्लेक्स-फ्यूएल: E100 (100% इथेनॉल) पर्यंतच्या मिश्रणावर चालण्यासाठी डिझाइन केलेली ही भारतातील पहिली कार आहे. ही कार E85 शी पूर्णपणे सुसंगत आहे.
  • हीरो स्प्लेंडर+ आणि एचएफ डिलक्स: हीरो मोटोकॉर्पने देशाच्या मास-मार्केट 100 सीसी सेगमेंटमध्ये पहिल्या फ्लेक्स-फ्यूएल मोटरसायकल सादर केल्या आहेत. या बाईक्स E20 ते E85 पर्यंतच्या इंधनावर चालू शकतात आणि जुलै 2026 पासून दिल्ली व महाराष्ट्रातील निवडक भागांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील. 
  • सुझुकी गिक्सर एसएफ: ही बाईक देखील या यादीत सामील झाली आहे, जी उच्च-इथेनॉल इंधनाला सपोर्ट करते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.