Bangladesh Hindu : सरकार बदललं पण.. प्रभू रामचंद्रांवरुन बांग्लादेशकडून हिंदुंच्या भावनांचा अपमान, तिथे लोक चिडून रस्त्यावर उतरले
Tv9 Marathi June 24, 2026 05:45 PM

शेजारच्या बांग्लादेशात सत्ता परिवर्तन झालं आहे. तारिक रहमान पंतप्रधान बनले. बांग्लादेशात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर इस्लामिक कट्टरपंथियांच्या मुसक्या आवळल्या जातील अशी अपेक्षा होती. पण असं घडताना दिसत नाहीय. उलट हिंदुंना रोखलं जातय. बांग्लादेशच्या गाइबांधामध्ये प्रभू रामचंद्रांचा 81 फूट उंच पुतळा उभारणीला स्थगिती देण्यात आली आहे. मानवाधिकार संघटना JMBF ने या बद्दल चिंता व्यक्त केली. इस्लामिक कट्टरपंथीयांच्या दबावाखाली सरकाराने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. शेख हसीना यांना सत्तेतून बेदखल केल्यानंतर बांग्लादेशात हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले.

प्रभू रामचंद्रांच्या पुतळा उभारणीला स्थगिती दिल्यानंतर बांग्लादेशातीलहिंदू समुदायाने रस्त्यावर उतरुन मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन केलं. मशाल हाती घेऊन या निर्णयाचा निषेध केला. बांग्लादेश सरकार तिथल्या कट्टरपंथीयांना लगाम घालून आणि हिंदू अल्पसंख्यांकांची सुरक्षा सुनिश्चित करेल असा विश्वास भारताने व्यक्त केला आहे.

ही घटना बांग्लादेशचं संविधानाच्या विरोधात

या महिन्याच्या सुरुवातीला मंदिरात मुर्ती बनवण्याचा विषय समोर येताच स्थानिक इस्लामिक संघटनेने जोरदार विरोध केला असं मानवाधिकार संघटना जस्टिस मेकर्स बांग्लादेश इन फ्रान्सने म्हटलं आहे. विरोधासाठी रॅली काढण्यात आल्या. पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. सरकारी अधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिले. वातावरण खराब झाल्याने आणि हिंसेच्या भितीने मंदिर प्रशासनाने 12 जून रोजी मुर्ती निर्माणाचं काम थांबवलं. हिंदू समुदायाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न झाल्याने काम थांबवण्यात आलं. ही घटना बांग्लादेशचं संविधान आणि जगातील मानवाधिकार नियमांच्या विरुद्ध आहे. संघटनेने कुठल्याही पक्षपाताशिवाय निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

धार्मिकतेच्या आधारावर अल्पसंख्यांकाना वारंवार टार्गेट

बांग्लादेशात धार्मिकतेच्या आधारावर अल्पसंख्यांकाना वारंवार टार्गेट केलं जातं. मागच्या काही वर्षात सांप्रदायिक हिंसाचार आणि पूजा स्थळांवर हल्ल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अशांततात आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताने बांग्लादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. मात्र, तरीही गोष्टी सुरळीत झालेल्या नाहीत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.