लोकलमध्ये रक्तरंजित थरार… दरवाजा बंद करायला सांगताच संताप, प्रवाशालाच भोसकलं; मुंबई हादरली
Tv9 Marathi June 24, 2026 03:45 PM

मुंबईत सध्या तूफान पाऊस सुरू असून दोन दिवसांपासून पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. मात्र या पावसात मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. पाऊस सुरु असताना लोकलचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं, त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला भोसकण्यात आलं. धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात मयंक लोहार या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान काल रात्री 10 वाजताच्या सुमारास हा भयानक प्रकार घडला. लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर तो वाद टोकाला गेला आणि त्यातच मयंकने आपला जीव गमावला.

मुंबईत काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेवरती बोरिवली जवळ एक घटना घडली होती. लोकलच्या दरवाज्यात उभं राहण्यावरून झालेल्या वादानंतर एकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार मंगळवारी रात्री पश्चिम रेल्वे मार्गावर घडला. काल रात्री जोरदार पाऊस पडत होतो, तो लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातही आत येत होता. त्यामुळे त्या डब्यात बसलेल्यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितला म्हणून दोन प्रवाशांमध्ये जोरदर वाद झाला. पाहात पाहता तो वाद प्रचंड वाढला आणि टोकाला गेला. रागाच्या भरात एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्या तरूणावर जोरदार वार केला.

या भयानक हल्ल्यात जखमी झालेल्या 22 वर्षीय मयंक लोहार या तरूणाचा ट्रेनमध्येच मृत्यू झाला. मात्र त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी अजूनही फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. अंधेरी ते बोरिवली दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.  जवळपास चार ते पाच महिन्यातील, मुंबईतील ही अशी दुसरी घटना आहे. अत्यंत गंभीर आणि धक्कादायक हा प्रकार असून प्रवाशांच्या मनातही दहशत आहे.

सध्या बोरिवली लोहमार्ग पोलिस या संपूर्ण प्रकाराची  चौकशी करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.