नागठाणे - प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत जिद्दीने आपला लौकिक निर्माण करणाऱ्या धावपटू अनुष्का कुंभार हिची मुंबईतील मुख्य आयकर आयुक्त कार्यालयात कर सहाय्यकपदी निवड झाली आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे गुणवंत खेळाडू कोट्यातून तिला हा सन्मान प्राप्त झाला आहे.
अनुष्का ही सातारा तालुक्यातील वर्णे गावची रहिवासी. तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. तिचे वडील दत्तात्रय कुंभार हे शेती अन् स्वतःचा पारंपरिक व्यवसाय करतात. आई स्वाती या गृहिणी आहेत. या दांपत्याने अनुष्कासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यातून ती आज देशातील अव्वल दर्जाची धावपटू म्हणून ओळखली जाते.
शालेय जीवनापासूनच आपल्या क्रीडा नैपुण्याची चमक दाखविणाऱ्या अनुष्काची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. प्राथमिक शाळेत असताना तिने यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेतून सर्वांचे लक्ष वेधले. पुढे गावातील श्री काळभैरव विद्यालयात शिकत असतानाही तिने भरीव कामगिरी बजाविली.
राष्ट्रीय स्पर्धांतून यश
साताऱ्यातील ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक बळवंत बाबर यांनी अनुष्काच्या कर्तृत्वाला पैलू पाडले. कोलंबिया, कुवेत देशांत झालेल्या मैदानी स्पर्धांत तिने यशाला गवसणी घातली. त्याआधी तिने पुणे, गुवाहाटी, भोपाळ, चेन्नई, छत्तीसगड, नदीयाल येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांतूनही पदकांची कमाई केली.
प्रतिकूल परिस्थितीत सराव
अनुष्का ही ग्रामीण भागातील. फारशा सोयीसुविधा नसतानाही तिने आपल्या सरावात कधीच खंड पडू दिला नाही. वर्णेतील पंचाचा माळ असो वा वर्णे- अंगापूर रस्ता असो, या ठिकाणचा तिचा सराव कधीही चुकत नसे. तिचे वडील दत्तात्रय कुंभार यांची जिद्दही याकामी महत्त्वपूर्ण ठरली. वर्णेतून ते रोज दुचाकीवरून तिला साताऱ्याला सरावासाठी ने- आण करत.
केवळ खेळाच्या बळावर शासकीय नोकरीत अधिकारीपदी झालेली अनुष्काची निवड अभिमानास्पद ठरणारी आहे. ग्रामीण भागातील मुलींना त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.
- दत्तात्रय कुंभार, अनुष्काचे वडील