व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
रोहित धामणस्कर June 25, 2026 10:43 AM

व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डियोस्डाडो काबेयो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराकस शहरातील अल्तामिरा भागात सर्वाधिक नुकसान झाले असून तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. या परिसरातील अनेक इमारती आणि घरं पडली आहेत. भूकंपाचे आणखी हादरे बसू शकतात, या शक्यतेने सरकारने लोकांना पुन्हा घरात जाऊ नये, अशी सूचना दिली होती. या दुर्घटनेत हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. 

नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला. भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले. या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.

एका मिनिटात भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसल्यामुळे कराकस शहराची वाताहात झाली आहे. हे भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, मोठमोठ्या इमारती गदागदा हलून जमीनदोस्त झाल्या. हे दृश्य पाहताना अनेकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. भूकंपाचे धक्के बसले तेव्हा लोकांना जमिनीवर उभे राहणेही मुश्कील झाले होते.  या इमारती एकाचवेळी कोसळल्यामुळे कराकस शहराच्या आकाशात धुळीचे प्रचंड लोट उठले होते. यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.