पान १
esakal June 25, 2026 07:45 PM
स्वस्ताचा खाऊ बालकांच्या आरोग्यासाठी ठरतोय महाग शाळांबाहेर ‘रंगीबेरंगी’ आजारांची विक्री; लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : शाळा सुटल्याची घंटा वाजताच लहान मुले वर्गाबाहेर पडतात आणि त्यांचे पावले थेट वळतात ती शाळेबाहेर असणाऱ्या विविध खाऊच्या गाड्यांकडे. शहरातील बहुतांश शाळांबाहेर अस्वच्छ आणि कृत्रिम रंगांचा थर असलेले अन्नपदार्थ उघड्यावर विकले जात असल्याचे चित्र आहे. अवघ्या ५ ते १० रुपयांत मिळणारे हे चटपटीत पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी गंभीर दूरगामी परिणाम करत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त होते आहे. रंगीत बर्फाचे गोळे आणि ‘बुढी के बाल’ सारख्या पदार्थांमध्ये अतिशय घातक स्वरूपातील रसायन असलेले रंग वापरले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. स्वस्त सॉस, शिळे तेल आणि ‘अजिनोमोटो’चा अतिवापर करून काही चटपटीत पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहेत. कोणत्याही ब्रँडचे नाव नसलेली अत्यंत स्वस्त आणि रासायनिक रंगयुक्त पेये विक्री केली जात आहेत. या वस्तूंच्या गुणवत्तेचा प्रश्न अतिशय गंभीर असून, याकडे सपशेल कानाडोळा केला जातो आहे. पालकांनीदेखील आपल्या पाल्याचा अशा पदार्थांपासून बचाव करण्याची आवश्यकता व्यक्त होते आहे. -------------------- शालेय परिसराच्या पाहाणीत काय आढळले? - तळलेले पोंगे, चटपटीत पदार्थांची विक्री - पिज्जापासून अन्य फास्टफूडची दुकाने - हातगाडीवर बर्फ गोळ्याची विक्री - सुट्टे चॉकलेट, गोळ्यादेखील उपलब्ध - वेफर्स व यासारखे पॅकेटबंद पदार्थ - पाणीपुरी, चनाचाटचे ठेले थाटलेले असतात ---------------- म्हणून स्वस्त पदार्थांना मुले भुलतात शाळकरी मुलांना घरून मिळणाऱ्या पॉकेट मनीतून खर्च भागवायचा असतो. त्यांना मोजून मापून पैसे दिले जातात. अशात उपलब्ध पैशांमध्ये हौस करता येईल, या उद्देशाने मुले आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या अशा स्वस्त खाद्य पदार्थांना भुलतात. बऱ्याच वेळी चटपटीत पदार्थ खाण्याचा मोह त्यांच्यात आहाराविषयी चुकीच्या सवयी लावण्यात कारणीभूत ठरतो. ---------------------- कृत्रिम रंगांचे/दुय्यम दर्जाच्या खाद्यपदार्थांचे होणारे दुष्परिणाम- - या पदार्थांमध्ये वापरलेले रासायनिक रंग, प्रिझर्व्हेटिव्ह्ज घातक असतात. - गळा सुजणे, खोकला आणि घशाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. * पोटदुखी, उलट्या आणि जुलाब किंवा अन्नातून विषबाधा होऊ शकते. * त्वचेवर ॲलर्जी येणे किंवा पुरळ उठण्याची तक्रार उद्भवू शकते. --- दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम शक्य- - कमी दर्जाच्या, रासायनिक रंगयुक्त पदार्थांच्या सततच्या सेवनाने गंभीर आजार होण्याचा धोका असतो. - कृत्रिम रंग आणि अति-साखरेमुळे मुलांमधील एकाग्रता कमी होते, मुले चिडचिडी आणि अतिचंचल बनतात. - शरीरात गेलेले रासायनिक रंग डिटॉक्स करताना मुलांच्या कोवळ्या यकृत, मूत्रपिंडावर ताण पडतो. यामुळे ते निकामी होण्याचा धोका - अनेक स्वस्त रंगांमध्ये कार्सिनोजेनिक घटक असतात. - अशा पदार्थांमुळे भूक मंदावते. मुलांना जेवणाची इच्छा होत नाही. - खराब दर्जाचे तेल आणि मैद्याच्या अतिवापरामुळे लहान वयातच मुलांमध्ये स्थूलपणा, मधुमेहाची लक्षणे दिसू शकतात. --- हे आहेत पौष्टिक पर्याय... - घरी बनवलेली भेळ किंवा चाट. - फळांचे पॉप्सिकल्स (घरचा गोळा). - मखणा आणि सुकामेवा - गूळ-शेंगदाणा चिक्की आणि लाडू - घरगुती चविष्ट पदार्थ.