शिवसेनेतील पक्षफुटीनंतर ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला असून, या प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, संजय दिना पाटील यांच्या बोलण्यावरून सत्ता आणि पदाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. “जोपर्यंत हे लोक आमच्यासोबत होते, तोपर्यंत शिस्तीत होते. मात्र पक्षांतरानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यात मोठा बदल झालेला दिसत आहे. पैसा आणि सत्ता किती लवकर डोक्यात जाऊ शकते, याचे हे उदाहरण आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
अंधारे यांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. “पत्रकारांशी बोलताना संजय दिना पाटील यांनी ‘कोणत्या कमिश्नरकडे जायचं ते जा’ अशा स्वरूपाची भाषा वापरली. यावरून ते पोलीस प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसते. त्यामुळे गृहखात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी,” असे त्या म्हणाल्या.
तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महिला, प्रवासी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सुरक्षित नसल्याच्या घटना घडत असताना आता पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गृहखाते नेमके कोणाच्या सुरक्षेसाठी काम करत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अधिकच चिघळण्याची शक्यता असून, या प्रकरणावर पुढे सरकार आणि संबंधित नेते काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.