मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
Tv9 Marathi June 25, 2026 09:46 PM

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका विवाहित महिलेच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोस्टमॉर्टम अहवालात महिलेचा मृत्यू नाक आणि तोंड दाबून गुदमरवून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

प्राजक्ता मेहेर असे मृत महिलेचे नाव असून, तिचा विवाह 2010 साली बदलापूरमधील एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर याच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुले असून कुटुंबात सर्व काही सुरळीत असल्याचे दिसत होते. मात्र, काही काळापासून योगेश मेहेर याचे गावातीलच पूजा मेहेर नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे.

यातूनच योगेश मेहेर पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत असल्याचे प्राजक्ताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 14 मार्च 2026 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून मुलीला घेऊन जाण्याची आणि पैसे देण्याची ऑफर दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

8 एप्रिल रोजी पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्राजक्ताचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्याने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

23 जून रोजी आलेल्या पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा अहवालात प्राजक्ताचा मृत्यू नैसर्गिक नसून नाक-तोंड दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली.

दरम्यान, या प्रकरणात योगेशची कथित प्रेयसी पूजा मेहेर तसेच इतर काही नातेवाईकांनाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.