आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात एखाद्या कुटुंबात दोन अवगुणी मुलं असतील तर त्यांच्यापेक्षा एक गुणी मुलगा असलेला कधीही चांगला. जर कुटुंबामध्ये अवगुणी मुलं जन्माला आली तर ती संपूर्ण कुटुंबाचा नाश करतात. मात्र जर गुणी मुलगा जन्माला आला तर तो मात्र संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करतो. चाणक्य पुढे असंही म्हणतात यामध्ये आई-वडिलांची देखील भूमिका महत्त्वाची असते, मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा ती चिखलाच्या गोळ्या सारखी असतात, ज्याप्रमाणे कुंभार चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्याचे सुंदर मडके घडवतो, त्याचप्रमाणे आई -वडिलांची भूमिका असते. मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी ही आई-वडिलांचीच असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
शिक्षण – चाणक्य म्हणतात जो मुलगा शिक्षण घेत नाही, अशिक्षित राहतो, असा मुलगा अवगुणी असतो. जो मुलगा अशिक्षित असतो, तो कधीही आपलं कुटुंब चांगल्या प्रकार सांभाळू शकत नाही, कालांतराने अशा कुटुंबाचा नाश होतो. त्यामुळे मुलांना चांगलं शिक्षण देणं ही जशी आई-वडिलांची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे ते शिक्षण ग्रहण करणं आणि त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करणं ही मुलाची जबाबदारी असते.
वाईट संगत – चाणक्य म्हणतात ज्या मुलांना वाईट संगत लागते, असा मुलगा आपल्या कुळाचा सर्वनाश करतो. त्यामुळे आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? तो कोणाच्या संगतीमध्ये आहे, याकडे आई-वडिलांनी लक्ष दिलेच पाहिजे. जर मुलगा वाईट संगतीमध्ये आहे, असं वाटत असेल तर त्याला त्यापासून परावर्तीत केलं पाहिजे.
आळशी मुलगा – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही, जर तुमचा मुलगा हा आळशी असेल तर त्याच्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. त्यामुळे मुलाला कधीही आळशी होऊ देऊ नका, त्याला लहानपणापासूनच कष्टाची सवय लावा, तो जेव्हा मोठा होईल, काम करायला सुरुवात करेल तेव्हा ही सवय त्याच्या फायद्याची ठरू शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)