Velhe Crime : बनावट मृत्यू दाखल्याने जमीन हडपली; पहिल्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश; राजगडमधील उपोषण आश्वासनानंतर मागे
esakal June 26, 2026 03:45 AM

वेल्हे - पती जिवंत असताना त्याला मयत दाखवून त्याच्या मृत्यूचा बोगस दाखला तसेच बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या अन्यायग्रस्त शेतकरी शंकर गेणू पिलावरे यांच्या पहिल्या पत्नी सावित्री शंकर पिलावरे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी (ता.२४) राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे यांनी दिले आहेत.

यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही शासन दखल घेत नसल्याने अन्यायग्रस्त जिवंत शेतकरी शंकर गणू पिलावरे हे बुधवारी राजगड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला कुटुंबासहित बसले होते. तहसीलदार ढाणे यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना पाठवून पिलावरे व त्यांच्या कुटुंबाची चर्चा केली व लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषणकर्ते व त्यांच्या कुटुंबाने उपोषण मागे घेतले.

बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेली वारस नोंद बेकायदा असल्याचे निष्पन्न झाल्याने ही नोंद रद्द करुन शंकर पिलावरे व त्यांचे बंधू मारुती यांच्या नावे पुर्वी प्रमाणे वेल्हे बुद्रुक ( ता.राजगड) येथील गट क्रमांक १६३,३३ व ८४ चे ७/१२ उतारे तयार करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिले आहेत.

शंकर पिलावरे यांची पहिली पत्नी सावित्री ही ३५ वर्षांपूर्वी घर सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर शंकर पिलावरे यांनी दुसरे लग्न केले. त्यांना दुसरी पत्नी, दोन मुली व दोन मुलगे असा परिवार आहे. वेल्हे बुद्रुक शेतावर उदरनिर्वाह होत नसल्याने ते पोटापाण्यासाठी कुटुंबासह मुंबईत राहत आहे.

अनेक वर्षांपासून शंकर पिलावरे हे गावी येत नसल्याने त्या संधीचा फायदा घेत काही जमीन दलालांनी पहिली पत्नी सावित्री शंकर पिलावरे (वय-५८, रा. चास, ता. खेड, सध्या रा. भोर) हिला हाताशी धरून शंकर पिलावरे यांच्या मृत्यूचा बोगस दाखला, प्रतिज्ञापत्र आदी बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्या आधारे शंकर पिलावरे यांचे वारसदार म्हणून सावित्री पिलावरे हिच्या नावाची ७/१२ च्या उताऱ्यात बेकायदा वारस नोंद केली.

बनावट कागदपत्रे सादर करून सावित्री पिलावरे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या सावित्री तसेच इतरांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

- निवास ढाणे, तहसीलदार, राजगड तालुका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.