अनेक दिवसांची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मॉन्सूनने आता दमदार बॅटिंगला सुरुवात केली. मुंबईत दमदार बसरल्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुन्हा उकाडा जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र, आता पाऊस वीकेन्डला धूनशान घालणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकण, मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यात सोमवारपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आठवड्याभर कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शनिवारी आणि रविवारी मुसळधरा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीला आठवड्याभरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आता मॉन्सूनच्या पुढील वाटचालीला वेग आला आहे. शनिवारनंतर मॉन्सून वेग धरणार असून त्याची पुढील वाटचाल जोमाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात मॉन्सून आता जोर धरण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट, ताशी ४०-५० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजनुसार १ ते ४ जुलै आणि त्यानंतरच्या काळात पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा जोमाने सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीवर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही अधूनमधून पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.





