अनिश्चिततेच्या काळात 'एफडीआय'चा वर्षाव
esakal June 26, 2026 09:46 PM

नवी दिल्ली, ता.२६ (वृत्तसंस्था) ः वाढता भू-राजकीय तणाव, व्यापारातील अडथळे आणि जागतिकस्तरावरील अनिश्चितता कायम असतानाही जागतिक कंपन्या आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारताच्या दीर्घकालीन आर्थिक विकासावर विश्वास दर्शविला आहे. गेल्या काही महिन्यांत भारतासाठी नव्वद अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
......
गुंतवणूक कशात?
- कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)
- क्लाउड कॉम्प्युटिंग
- डिजिटल पायाभूत सुविधा
- उत्पादन, औद्योगिक तंत्रज्ञान

- ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर २०३० पर्यंत भारतातील एकूण गुंतवणूक ४८ अब्ज डॉलरपर्यंत वाढणार आहे. ही गुंतवणूक क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सेवांच्या विस्तारासाठी वापरली जाईल.

- या महिन्याच्या आरंभीच ऑस्ट्रेलियन डेटा सेंटर ऑपरेटर ‘एअरट्रंक’ने २०३० पर्यंत भारतात ५ गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर उभारण्यासाठी ३० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना जाहीर केली. ही देशातील आतापर्यंतची सर्वांत मोठी डिजिटल पायाभूत सुविधा गुंतवणूक ठरणार आहे.

- फ्रान्सची बांधकाम साहित्य निर्मिती करणारी कंपनी ‘सेंट-गोबेन’ने १८ जून रोजी पुढील पाच वर्षांत भारतात अतिरिक्त एक अब्ज युरो (१.१५ अब्ज डॉलर) गुंतविणार असल्याचे जाहीर केले.

- ‘कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डा’ने डेटा सेंटरच्या सहकार्याने हायपरस्केल डेटा सेंटर क्षमता वाढविण्यासाठी सात हजार कोटी गुंतविण्याचे जाहीर केले आहे. औद्योगिक तंत्रज्ञान कंपनी ‘एबीबी’ने मार्चमध्ये उत्पादन आणि संशोधन क्षेत्राच्या विस्तारासाठी ७ कोटी ५० लाख डॉलरची गुंतवणूक जाहीर केली आहे.

- गुगलने फेब्रुवारीमध्ये भारतात डेटा सेंटर, सबसी कनेक्टिव्हिटी, क्लाउड क्षमता आणि कौशल्य विकासासाठी
पंधरा अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची पंचवार्षिक योजना जाहीर केली आहे.


म्हणून आत्मविश्वास वाढला
पश्चिम आशियातील संघर्ष आणि बदलत्या व्यापार धोरणांमुळे जागतिक जोखीम वाढलेली असतानाही बहुराष्ट्रीय कंपन्या भारताकडे उत्पादन आणि तंत्रज्ञानासाठी एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, विस्तारणारी डिजिटल अर्थव्यवस्था आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे जागतिक गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.