पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथी’च्या वतीने आयोजित यूपीएससी,एमपीएससी व इतर उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील नाराजीनाट्य समोर आलं आहे. पहिल्या रांगेत बसण्यावरुन झालेल्या वादानंतर मेधा कुलकर्णी मंचावरुन निघून गेल्या होत्या. अभिमन्यू पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर मेधा कुलकर्णी भूमिका मांडली. अभिमन्यू पवार यांना माफ करते, मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या मुलांचं अभिनंदन करत असल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी सारथी संस्थेच्या माध्यमातून होतकरु विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी भक्कम यंत्रणा तयार केल्यानं त्यांचं अभिनंदन करते. चांगल्या मनस्थितीनं त्या कार्यक्रमाला गेले होते, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या की कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. माधुरीताई किंवा अन्य मंत्रिमहोदय आलेले नव्हते त्यामुळं खुर्च्या रिकाम्या होत्या. अधिकारी म्हणत होते, जर का या खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णी यांचा प्रोटोकॉल आहे. माझ्याकडे एका कमिटीचं अध्यक्षपद आहे, म्हणून ते मला म्हणत होते इथं बसा, मी म्हणलं की नरेंद्र पाटील ही बसू शकत होते, महामंडळाचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिमन्यू पवारांना तिथं बसायचं होतं, म्हणून धावाधाव चालली होती, मी बसतो तर अधिकारी म्हणाले की यांच्यानंतर मेधा कुलकर्णींचं नाव येतं तर ते (अभिमन्यू पवार) असं म्हणाले की, हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही इथं बसलात तर वाद होईल. हा कार्यक्रम नक्कीच अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्वान मराठा समाजातील मुलांचा आहे, त्यांना शाबासकी देण्याचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम शासनाचा आहे, शासकीय प्रोटोकॉल नुसार खुर्च्यांची रचना केलेली असते. जात बघून रचना केलेली नसते, असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं.
मी कुठेही गेले तरी हिंदू म्हणून जगलं पाहिजे, असं आवाहन करते जातीचा विषय आला कुठे?, असं म्हटलं. अभिमन्यू पवार जेव्हा निवडणुकीला सामोरं जात होते, तेव्हा त्यांनी माझ्याकडे या ब्राह्मण समाजाचा मेळावा ठेवणारआहे, असं म्हटलं. तब्येत ठीक नव्हती तरी लांबचा प्रवास करुन त्यांच्यासाठी गेले. ब्राह्मण समाजाला अभिन्यूजींच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. समाजाचा प्रश्न येत नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीशी राहिलं पाहिजे.
आज देशात परिस्थिती वेगळी आहेत, आव्हानं वेगळी आहेत, प्रश्न वेगळी आहेत. ज्याला उत्तर देण्यासाठी हिंदू समाज येईल का हा मुद्दा आहे. एकमेकांच्या जाती काढून काय फायदा आहे. कार्यक्रम वेगळा चाललाय, तुम्ही कशावरुन बोलताय, मला सफोकेट झालं, मला चुकीचं वाटलं, मी तिथून निघून आले, असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस लाऊंजमध्ये बसले होते. तिथं मराठा समाजातील बांधव माझ्यासोबत होते, त्यांना घेऊन गेले होते. अभिजीत पवार त्यांना आत घेऊ नका, असं म्हणत होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं बोलले, अभिमन्यूजी तुम्हाला ओएसडी समजता का?, असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला.
हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही बसलात तर वाद होईल, याचा आणखी वेगळा कोणता मतितार्थ आहे हे सांगा असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला.