न्याहळोद येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साचून 'तलाव
esakal June 26, 2026 08:45 PM
(पान ४ ला मेन) NYA26B01477 न्याहळोद : येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली साचलेले पावसाचे पाणी. ------------ धुळे- न्याहाळोद मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाखाली ‘तलाव’ पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने वाहनचालक, विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल सकाळ वृत्तसेवा न्याहाळोद, ता. २६ : धुळे- न्याहाळोद मुख्य रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साचून अक्षरशः तलाव निर्माण झाला आहे. पाणी निचऱ्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल होत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेल्वे मार्गाखालचा रस्ता मूळ पातळीपेक्षा सुमारे पाच ते सहा फूट खोल असल्याने पावसाचे सर्व पाणी पुलाखाली साचते. मात्र, ते बाहेर जाण्यासाठी नाले, गटार किंवा अन्य जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या उभी राहत आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. साचलेल्या पाण्याची खोली किती आहे, याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक बनत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने वेळ, इंधन आणि पैशांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या नवीन नसून दरवर्षी पावसाळ्यात पुलाखाली पाणी साचते. याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने ये- जा करतात. साचलेल्या पाण्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची वाहने अडकल्यास गंभीर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. उड्डाणपूल बांधताना पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, याचा विचार का करण्यात आला नाही? प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करायचा आणि प्रशासनाने केवळ पाहत बसायचे का? धुळे- न्याहाळोद मार्गावरील ही गंभीर समस्या आता अपघाताची वाट न पाहता तातडीने सोडविण्याची वेळ आली असून, संबंधित यंत्रणांनी जबाबदारी स्वीकारून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. --------- कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी रेल्वे प्रशासनाने तातडीने उड्डाणपुलाखालील भागाचे तांत्रिक सर्वेक्षण करून दोन्ही बाजूंना नाले, गटार किंवा पंपिंग प्रणाली उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त पाहणी करून ही समस्या कायमची सोडवावी, अशीही नागरिकांची ठाम भूमिका आहे. --------