Ireland vs India, 1st T20I Marathi Cricket Updates: श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून सुरुवात काही खास झाली नाही. फलंदाजीत तो अपयशी ठरला, परंतु संघानेही निराशाजनक कामगिरी केली. आयर्लंडच्या १८२ धावांचा पाठलाग करताना भारताच्या स्टार फलंदाजांनी खराब फटके खेचून विकेट फेकल्या. अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकानंतर बर्थ डे बॉय शिवम दुबे ( Shivam Dube) आणि अक्षर पटेल यांच्याकडून संघर्षाची अपेक्षा होती. पण, मुळचा भारतीय असलेल्या जय मुंद्राने ( Jai Moondra) करेक्ट कार्यक्रम केला, दोन महत्त्वाच्या विकेट घेत त्याने सामना फिरवला आणि आयर्लंडला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
आयर्लंडने ४ बाद ५१ धावांवरुन पुनरागमन करताना भारतासमोर १८३ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. हर्षित राणा ( ३-२४), अर्शदीप सिंग ( २-२८) व अक्षर पटेल ( २-३३) यांनी आयर्लंडला धक्के दिले. पण, कर्णधार लॉर्कन टकर व गॅरेथ डेलनी यांनी खणखणीत फटकेबाजी केली. टकरने ३६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा केल्या, तर डेलनीने ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा कुटल्या. डेलनीने प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात २७ धावा चोपताना ६ षटकार व दोन चौकार हाणले. टकर व डेनली यांनी ४४ चेंडूंत ६४ धावा जोडल्या, तर डेनली व जॉर्ज डॉकरेल यांनी १७ चेंडूंत ४९ धावांची भागीदारी केली.
कर्णधार म्हणून टकरने तिन्ही ट्वेंटी-२० सामन्यांत अर्धशतक झळकावले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध २०२४ मध्ये ७३ आणि २०२६ मध्ये ओमानविरुद्ध नाबाद ९४ धावांची खेळी केली होती. कर्णधार म्हणून पहिल्या तीन ट्वेंटी-२०त अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. याशिवाय कर्णधार म्हणून पहिल्या तीन ट्वेंटी-२०त सर्वाधिक २१७ धावांचा विक्रमही त्याने केला. प्रत्युत्तरात मैदानावर आलेला संजू सॅमसन ( ४) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. पण, अभिषेक शर्माने मोर्चा सांभाळताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. जय मुंद्राने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर संजूची विकेट घेतली आणि आयर्लंडसाठी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो मॅथ्यू हम्फ्रेयसनंतर दुसरा खेळाडू ठरला.
पदार्पणवीरच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा संजू हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. इशान किशनलाही ( १) मॅथ्या हॉलार्डने बाद केले. श्रेयस अय्यरही ( ३) हॉलार्डच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. पण, अभिषेकने १९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. मात्र, लाएम मॅकर्थीने आयर्लंडला ही विकेट मिळवून दिली. अभिषेक ५० धावांवर झेलबाद झाला. आयर्लंडविरुद्ध हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. अभिषेकने इंग्लंडच्या फिल सॉल्टचा ( २० चेंडू) मागच्या वर्षीचा विक्रम मोडला. तिलक वर्माही ( १९) माघारी परतल्याने भारताचा निम्मा संघ ९० धावांत तंबूत परतला.
शिवम दुबेवर सर्व मदार होती आणि त्याने भारतीयांमध्ये सर्वात कमी चेंडूंत ट्वेंटी-२०त १००० धावा करणाऱ्यांमध्ये तिसरे ( ६४८) स्थान पटकावताना संजूचा ( ६७९) विक्रम मोडला. अभिषेक शर्मा ( ५२८) व सूर्यकुमार यादव ( ५७३) या विक्रमात पुढे आहेत. मॅथ्यू हम्फरेयने स्वतःच्याच गोलंदाजीवर अक्षर पटेलचा झेल टाकल्याने भारतीयांच्या जीवात जीव आला. भारताच्या १५ षटकांत ६ बाद १२९ धावा झालेल्या आणि ३० चेंडूंत त्यांना आणखी ५४ धावा करायच्या होत्या.
जय मुंद्राने १६व्या षटकात शिवमचा ( २५) अप्रतिम रिटर्न झेल टिपून भारताला मोठा धक्का दिला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर १५ धावांवर झेलबाद झाला. १९ चेंडूंत ४६ धावा भारताला करायच्या होत्या आणि हाती फक्त दोन विकेट्स होत्या. १८ व्या षटकात हर्षित राणाचा सोपा झेल टाकल्याने भारतीयांनी आनंद साजरा केला. पण, अजूनही भारताला १२ चेंडूंत ३६ धावा हव्या होत्या. पण, पुढच्या षटकात तो ( ८) झेलबाद झाला. भारताचा संपूर्ण संघ १४८ धावांत तंबूत परतला आणि आयर्लंडने ३४ धावांनी विजय मिळवला.