Raigad Safety Row: कुंभे धबधब्यातील प्रतिबंधित सुळक्याचे रील एमटीडीसीच्या पेजवर
esakal June 27, 2026 01:45 AM

पाली : पर्यटनाच्या नावाखाली शासकीय यंत्रणा कशा प्रकारे निष्काळजीपणा करू शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी रील बनवताना प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आन्वी कामदार हिचा ३५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झालेल्या माणगाव जवळील कुंभे धबधब्याच्या प्रतिबंधित व धोकादायक सुळक्याचे आकर्षक रील एमटीडीसीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून प्रसारित करण्यात आले आहे. कोणत्याही सुरक्षा सूचनेशिवाय हे रील पोस्ट करून पर्यटकांच्या जिवाशी खेळ मांडल्याप्रकरणी आणि वस्तूस्थिती सांगणाऱ्या नागरिकांच्या कमेंट्स डिलीट केल्याबद्दल वन्यजीव अभ्यासक आनंद मोहिते यांनी एमटीडीसी प्रशासनाविरोधात थेट रायगड पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.

या रीलवर स्थानिक नागरिक, ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी कमेंट्स करून हे ठिकाण धोकादायक असल्याची आणि तिथे न जाण्याची जनजागृती सुरू केली होती. मात्र, एमटीडीसीच्या सोशल मीडिया ॲडमीनने वस्तूस्थिती लपवण्यासाठी या सर्व सावध करणाऱ्या कमेंट्स थेट डिलीट (हटवणे) करण्यास सुरुवात केली. शासकीय यंत्रणेने अशा प्रकारे लोकांच्या जिवाशी खेळणे आणि सत्य दडपून टाकणे अत्यंत निषेधार्ह आहे. असे सांगून या गंभीर प्रकाराची दखल घेत वन्यजीव अभ्यासक आनंद मोहिते यांनी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि रायगडचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.

एमटीडीसीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर कुंभे धबधब्याचा असा भाग दाखवला जो पर्यटकांसाठी अत्यंत असुरक्षित आणि प्रतिबंधित मानला जातो. याच ठिकाणी 16 जुलै 2024 साली रील बनवताना आन्वी कामदार या तरुणीला आपला जीव गमवावा लागला होता. यावेळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था या रेस्क्यू टीमने आणि इतर जीव रक्षकांनी रेस्क्यू मोहीम केली होती.

मात्र आता प्रशासनाने त्याच जागेला पुन्हा ग्लॅमरस करून दाखवले. नागरिक आणि स्थानिक रेस्क्यू टीमने लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला असता प्रशासकीय पेजवरून त्यांच्या कमेंट्स पद्धतशीरपणे हटवण्यात आल्या. वन्यजीव अभ्यासक आनंद मोहिते यांनी या रीलचे स्क्रीनशॉट, आन्वी कामदार अपघाताचे वृत्तपत्रीय पुरावे आणि कमेंट्स डिलीट केल्याचे पुरावे जोडून थेट पोलीस रायगड अधीक्षकांकडे कारवाईची मागणी केली आहे.

पर्यटनाला प्रोत्साहन देताना पर्यटकांच्या जीवित सुरक्षेशी तडजोड करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. सदर रील तत्काळ हटवण्यात यावी. संबंधित ठिकाण धोकादायक असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात यावा. अन्यथा भविष्यात या ठिकाणी रिल्स पाहून कोणी पर्यटक गेल्यामुळे दुर्घटना, जीवितहानी किंवा बचावकार्याची वेळ आल्यास त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी एमटिडीसीवर राहील. तसेच अशा घटनांमुळे होणाऱ्या बचावकार्याचा खर्च, मनुष्यबळावरील ताण आणि जीवितहानीबाबत उत्तरदायित्व निश्चित हे पूर्णपणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांची असेल.

आनंद मोहिते, वन्यजीव अभ्यासक, मालाड-मुंबई

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.