मुंबईत पुन्हा रक्तरंजित थरार; माहिम रेल्वे स्टेशनबाहेर तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
Tv9 Marathi June 28, 2026 01:45 PM

मुंबईत पुन्हा रक्तरंजित थरार घडला आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिम स्टेशनबाहेर किरकोळ धक्काबुक्कीच्या वादातून ३५ वर्षीय व्यक्तीवर अज्ञात हल्लेखाराने धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रसन्ना असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नवीन हा माहिम पश्चिम भागात असलेल्या पितांबर लेन भागात राहायला आहे. नवीन हा गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लोअर परळ येथील ऑफिसमधून काम आटोपून घरी परतत होता. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोराने नवीनवर जीवघेणा हल्ला केला.

नेमकं काय घडलं?

माहिम स्टेशनबाहेर जात असताना नवीनचा अज्ञात व्यक्तीला धक्का लागला. त्यानंतर अज्ञात हल्लेखोराने मोबाइल खाली पडून तुटल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने नवीनकडे नुकसानभरपाईची मागणी केली. परंतु नवीनने पैसे देण्यास नकार दिला. याच रागातून हल्लेखोराने नवीनवर चाकू काढून वार केले. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीच्या हल्ल्यात नवीनच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यात नवीन रस्त्यावर कोसळला. आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नवीनला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नवीनचे भाऊ सचिन यांनी सांगितलं की, नवीन हा लोअर परळ भागातील जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम कार्यरत आहे. जीवघेण्या हल्ल्यानंतर नवीन जवळपास 15 तास बेशुद्ध होता.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.  हल्ला केल्यानंतर आरोपी रेल्वे मार्गाने घटनास्थळावरून फरार झाल्याचे संशय व्यक्त करण्यात आलाय. आरोपी हा अंमली पदार्थांचा व्यसनाधीन असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या चिंता पुन्हा वाढली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.