मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल, मी विमानात…
Tv9 Marathi June 28, 2026 06:45 PM

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमानप्रवासावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विमान प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल दिसत होते. फडणवीसांना कळतंय की, त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा दावा ठाकरेंनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी वाढवण बंदराच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंसोबत एकत्र विमानप्रवासावरही भाष्य केलं. ठाकरेंच्या हतबल असल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते एका कोपऱ्यात बसलो होतो. तर ते दुसऱ्या कोपऱ्यात बसले होते. मी विमानात बसल्यानंतर सवयीनुसार डाऊनलोड केलेला सिनेमा, ओटीटीवरील सीरीज पाहत होतो. विमान सुरू झाल्यापासून उतरेपर्यंत मी सीरीज पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता कुठे दिसली? मी मनुष्य असल्याने मला पंखच नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार आहेत.

‘माझ्यासोबत 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे. माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या सदिच्छा मी स्वीकारतो. 2019 साली असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं. त्यावेळी देऊ शकले नाहीत. त्यांच्या सद्धिच्छा आज स्वीकरतो, असे फडणवीसांनी सांगितले. तसेच ठाकरे आणि मी बाजूला बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमानप्रवासात हा योगायोगाने एकत्र आलो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मी फक्त लोकांचा विचार करणार – फडणवीस 

देशात ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरू असल्याच्या ठाकरेंच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी राजकीय प्रश्न दुय्यम आहेत. राजकीय प्रश्नांनी कोणाचंही भलं होणार नाही. मला लोकांचं भलं होणार, याचा मी विचार करणार. आम्ही आजूबाजूला बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या’. मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.