उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु
Tv9 Marathi June 28, 2026 08:45 PM

भायखळा येथे मोहरमच्या जुलूसमध्ये पेनकिलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटण्याचा एक मोठा कट मुंबई पोलिसांनी उधळला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय फैयाज निसार हुसैन प्रेमजी याला मुंबई पोलिसांनी गोळ्या वाटत असताना अटक केली आहे. या आरोपीकडून सुमारे १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’सारखे विषारी रसायन आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, झिंक फॉस्फाईडचा वापर सहसा उंदीर मारण्याचे औषध म्हणून केला जातो. मात्र, या प्रकरणातील अंतिम फॉरेन्सिक रिपोर्टची अद्याप प्रतीक्षा आहे.

मोहरम मिरवणुकी दरम्यान दक्षिण मुंबईतील भायखळा-रे रोड परिसरात पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती लोकांना मोफत कॅप्सूल वाटत आहे. आरोपी कथितपणे या कॅप्सूल वेदनाशामक (पेनकिलर) आहेत आणि आरोग्यासाठी चांगल्या असल्याचे सांगून लोकांना घेण्यास सांगत होता. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या.

मुंबई पोलिसांच्या मते, प्राथमिक तपासात जप्त केलेल्या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’ असण्याची शक्यता आहे. आरोपीने चौकशी दरम्यान सुमारे ३० हजार रिकाम्या कॅप्सूल मागवल्याची आणि त्यात विषारी पदार्थ भरल्याची कबुली दिली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हे झिंक फॉस्फाईड कुठून खरेदी केले गेले, कॅप्सूल कुठे तयार करण्यात आल्या आणि या संपूर्ण कटात इतर कोणी सामील होते का, याचाही तपास केला जात आहे.

आरोपी कोण आहे?

अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख फैयाज निसार हुसैन प्रेमजी अशी झाली आहे. त्याचे वय ४१ वर्षे असून तो पुण्याच्या विमान नगर भागातील रहिवासी आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बीए (BA) पर्यंत शिक्षण घेतले असून तो त्याच्या कौटुंबिक पेंट (रंग) व्यवसायाशी जोडलेला आहे. प्राथमिक तपासात त्याच्या नावावर कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी रेकॉर्डचा थांगपत्ता लागलेला नसल्याने पोलिस बुचकळ्यात पडले आहेत.

उंदीर मारण्याचे औषध

झिंक फॉस्फाईड हे अत्यंत विषारी रसायन आहे, ज्याचा मुख्य वापर उंदीर मारण्याचे औषध बनवण्यासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या मते, हे पोटात गेल्यानंतर अत्यंत विषारी वायू (गॅस)तयार करतो, ज्यामुळे शरीराचे महत्त्वाचे अवयव निकामी होऊ शकतात.जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यास ते जीवघेणे देखल ठरू शकते. मात्र, या प्रकरणात जप्त केलेल्या कॅप्सूलचा अंतिम रासायनिक तपासणी अहवाल (केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट) अद्याप येणे बाकी आहे.

मुंबई पोलीस सध्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत—

झिंक फॉस्फाईडची खरेदी कुठून झाली?

रिकाम्या कॅप्सूल कोणत्या माध्यमातून खरेदी केल्या गेल्या?

आरोपी एकटाच काम करत होता की त्याच्यासोबत एखादे नेटवर्क जोडलेले होते?

या  कटाचा मुख्य उद्देश काय होता?

यामध्ये कोणत्याही संघटनेची किंवा इतर व्यक्तीची भूमिका आहे का?

या प्रकरणातील फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नाही आणि पोलिसांनी कोणत्याही मोठ्या कटाशी किंवा संघटनेशी आरोपीचे संबंध असल्याचे म्हटलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येतील. पोलीस सध्या आरोपी फैयाज प्रेमजी याचा मोबाईल फोन, डिजिटल डेटा, बँक व्यवहार आणि कॉल रेकॉर्डचीही सखोल तपासणी करीत आहेत. आरोपी इराण आणि इराकला जाऊन आला होता त्याची चौकशी पोलिस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.