काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. दोन गटात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले नावच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. विलास घुले हा हॉटेल व्यावसायिक होता. दरम्यान विलास घुले यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी विलास घुले याच्या कुटुंबाची भेट घेतली होती, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती, दरम्यान या प्रकरणात एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सैरव सोनवणे याच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सैरव सोनवणे याची एसआयटीकडून चौकशी देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे, त्यामुळे आता तपासाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि चाकू एसआयटीकडून जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळावर ज्या चार चाकी गाडीने आरोपी दाखल झाले होते, ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी एसआयटीने जप्त केली आहे. तर ज्या चाकुने विलास घुलेंवर वार करण्यात आला तो चाकू देखील आरोपीच्या शेतातून एसआयटीने जप्त केला आहे. दरम्यान आता विलास घुले हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा एसआयटीच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
विलास घुले हा एक हॉटेल व्यावसायिक होता, दोन गटात भांडण सुरू होते, त्यामुळे तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी आरोपीने त्याच्यावरच हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्यामुळे या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.