IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले
esakal June 28, 2026 11:45 PM

Ireland vs India, 2nd T20I Marathi Cricket Update: पहिल्या सामन्यातील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या आयर्लंड संघाने दुसऱ्या सामन्यात भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे केले. आयर्लंडला यापेक्षा जास्त धावा करता आल्या असत्या, परंतु शिवम दुबेने सलग दोन विकेट्स घेऊन यजमानांची धावगती संथ केली. हॅरी टेक्टर व बेन कॅलित्झ यांनी आयर्लंडच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला. अर्शदीपनेही दोन विकेट्स घेतल्या.

वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाकडून पदार्पणासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२०तही त्याला संधी मिळालेली नाही. पण, भारताच्या प्लेइंग इलेव्हमध्ये सूर्यांश शेडगे व प्रिंस यादव, या दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे. वॉशिंग्टन सुंदर व प्रसिद्ध कृष्णा यांच्याजागी त्यांना संधी मिळाली आहे. भारताकडून ट्वेंटी-२०त आतापर्यंत १२१ खेळाडूंनी पदार्पण केले आहेत आणि पाकिस्तान हा या फॉरमॅटमध्ये ( १२५) सर्वाधिक खेळाडू खेळवणारा संघ आहे. आजच्या सामन्यात इशान किशन यष्टिरक्षण करणार आहे, संजू सॅमसन क्षेत्ररक्षण करताना दिसेल.

  • Ireland: टीम टेक्टर, रॉस एडर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन कॅलित्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, मॅथ्यू हम्फरेयस, मॅट हॉलार्ड, लिएम मॅकार्थी, जय मुंद्रा

  • India: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिंस यादव.

हर्षित राणाने भारताला पहिले यश मिळवून दिले. टीम टेक्टर ( ५) दुसऱ्या षटकात अभिषेक शर्माच्या हाती झेलबाद झाला. पुढच्या षटकात विकेट मिळाली असती आणि हर्षितने झेलसाठी पूर्ण जोर लावला होता, परंतु त्याला अपयश आले. मात्र, पुढच्याच चेंडूंवर रॉस एडरने( १६) आणखी एक संधी दिली आणि यावेळेस तिलक वर्माने झेल टिपला. आयर्लंडने डावात स्थिरता मिळवताना पॉवर प्लेमध्ये २ बाद ४४ धावा केल्या. मागील सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या कर्णधार लॉर्कन टकरला ( १५) पदार्पणवीर प्रिंस यादवने बाद केले.

हॅरी टेक्टर व बेंजामिन कॅलित्झ यांनी आयर्लंडचा डाव सावरताना चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली होती आणि त्यांच्या प्रत्येक रणनीतीचे उत्तर त्यांच्याकडे होते. शिवम दुबेने सलग दोन चेंडूंवर आयर्लंडच्या बेन ( ३७) व गॅरेथ डेलनी ( ०) यांना बाद करून भारताला सामन्यात पुनरागमन मिळवून दिले. टेक्टर व बेन यांची ६५ धावांची भागीदारी ही भारताविरुद्ध आयर्लंडकडून झालेली दुसरी सर्वोत्तम बागीदारी ठरली. यापूर्वी २०२२ मघ्ये स्टीर्लिंग व बालबर्नी यांनी ७२ धावा जोडल्या होत्या.

टेक्टर ४७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५३ धावांवर झेलबाद झाला. आपल्या १००व्या ट्वेंटी-२० सामन्यांत अर्धशतक झळकावणारा तो सातवा फलंदाज ठरला. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल ( नाबाद १०४), रोहित शर्मा ( ८५), जॉस बटलर ( ७३), डेव्हिड वॉर्नर ( ७०), क्विंटन डी कॉक ( ६५) व रॉस टेलर ( ५३) यांनी हा पराक्रम केला होता. आयर्लंड ८ बाद १५४ धावा करू शकले. पदार्पणवीर प्रिस यादवने ४-०-२२-३ अशी भन्नाट कामगिरी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.