आयर्लंडने भारतीय संघाला टी20 मालिकेत व्हाईटवॉश देत इतिहास रचला. भारतीय संघावर पहिल्यांदाच आयर्लंडकडून व्हाईटवॉशची नामुष्की ओढावली. या मालिकेपासून बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे टी20 संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. पण पहिल्याच मालिकेत भारतीय संघाचा 2-0 ने पराभव झाला. या पराभवामुळे क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. दुबळ्या संघाकडून व्हाईटवॉश मिळाल्याने सोशल मीडियावर टीका केली जात आहे. इतकंच काय तर मीम्सही व्हायरल होत आहेत. दुसऱ्या टी20 सामन्यात आयर्लंडने विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघाला 20 षटकात 9 गडी गमवून 153 धावा करता आल्या. भारताने हा सामना 1 धावेने गमावला. दुबळ्या आयर्लंड संघाकडून मिळालेल्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासावर एक काळा डाग लागला आहे.
काय म्हणाला श्रेयस अय्यर?टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘ही मालिका फार चांगली झाली नाही, पण ज्या पद्धतीने ते खेळले त्याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच हवे. खेळपट्टी कशी खेळेल याची त्यांना जबरदस्त कल्पना होती आणि त्यांचे क्षेत्ररक्षण अप्रतिम होते. गोलंदाजांनीही आपल्या कामगिरीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्या विभागात त्यांनी आमच्यावर मात केली. त्याला आयपीएलचा मोठा अनुभव आहे, गोलंदाजीला आल्यावर त्याच्या स्वतःच्या कल्पना आणि योजना असतात, सूर्यांशच्याही तशाच आहेत. येथे असणे हा एक सन्मान आणि आनंद आहे.’
काय म्हणाला आयर्लंडचा कर्णधार?आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकर म्हणाला की, ‘माझा यावर विश्वासच बसत नाही. मी मुलांना आव्हान दिले होते की, ही केवळ एक अपवादात्मक घटना नव्हती हे जगाला दाखवून द्या आणि हो, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. आम्ही मागच्या सामन्याप्रमाणेच त्याच इराद्याने मैदानात उतरलो. आम्ही दाखवून दिले की क्रिकेट सोपे असू शकते आणि त्याला गुंतागुंतीचे बनवण्याची गरज नाही. आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी फार कमी सामने खेळले आहेत, पण त्यांनी उत्तम खेळ दाखवला. भारताविरुद्ध असे सामने खेळायला मिळणे हे आमचे भाग्य आहे. आयर्लंडमध्ये व्यावसायिक क्रिकेटसाठी हा एक उत्तम काळ आहे.’