T20 World Cup Semi Final: भारताचे स्वप्न तुटले! ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला उपांत्य फेरीत पोहोचवले; आता कोण कोणाला कुठे भिडणार?
esakal June 29, 2026 02:45 AM

Who will play whom in T20 World Cup 2026 semi-finals? भारतीय महिला संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करो किंवा मरो सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाला पराभव पत्करावा लागला.. भारताच्या या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत प्रवेश मिळणारा चौथा संघ ठरला. भारताला अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण, हरमनप्रीत कौरच्या पोरी अपयशी ठरल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

स्मृती मानधना ( ३८), शफाली वर्मा ( ३४), जेमिमा रॉड्रिग्ज ( ३४) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( ५६) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ४ बाद १७० धावा केल्या. हरमनप्रीतने २७ चेंडूंत ५६ धावांची वादळी खेळी केली. पण, भारतीय गोलंदाजांनी निराश केले. ऑसींच्या ३ विकेट्स ६८ धावांवर जावूनही भारताला सामन्यावर पकड घेता आली नाही. एलिसे पेरी व अॅश्ली गार्डनर यांनी १०० धावांची भागीदारी करून सामना हिसकावून नेला.

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

बेथ मूनी ( २२) व फोएबे लिचफिल्ड ( २४) यांनी अर्धशतकी भागीदारी करून सावरलेल्या डावाला गार्डनर व पेरी यांनी आकार दिला. पेरी ३८ चेंडूंत ५६ धावांवर माघारी परतली, परंतु गार्डनरने २९ चेंडूंत ५३ धावांची नाबाद खेळी करून मॅच जिंकून दिली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे ग्रुप १ मधून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचली आणि ग्रुप २ मधून इंग्लंड व वेस्ट इंडिज अंतिम चारमध्ये खेळणार आहेत.

ICC T20 World Cup 2026 latest knockout schedule

ऑस्ट्रेलियन महिला संघाने ग्रुप १ मधील अपराजित मालिका पाचव्या सामन्यातही कायम राखून १० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यनंतर सलग चार विजयांची नोंद केली आणि ते ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. ग्रुप दोनमध्ये इंग्लंडचा संघ पाचही सामन्यात अपराजित राहिला आहे आणि गटात अव्वल आहे. तेच वेस्ट इंडिजने तीन सामने जिंकून ६ गुण व श्रीलंकेपेक्षा सरस नेट रन रेटच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आहे.

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला ग्रुप २ मधील दुसऱ्या क्रमांकाचा संघ म्हणजेच वेस्ट इंडिजविरुद्ध ३० जून रोजी ओव्हलवर खेळावे लागणार आहे, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना २ जुलैला ओव्हलवरच होईल. अंतिम सामना ५ जुलैला लॉर्ड्सवर खेळवला जाईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.