Chanakya Niti : जवळचे लोकच देतात धोका, अशी घ्या काळजी, चाणक्य काय सांगतात?
Tv9 Marathi June 30, 2026 12:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की अनेकदा असं होतं की आपण ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, जे लोक आपल्या खूप जवळचे असतात तेच आपल्याला धोका देतात. अशा लोकांवर आपला प्रचंड विश्वास असल्यामुळे अशा लोकांपासून आपण बेसावध असतो, आणि नेमका याच संधीचा हे लोक फायदा घेतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे आपले बाहेरचे शत्रू असतात, अशा लोकांपासून आपण नेहमी सावध असतो. कारण आपल्याला हे चांगलं माहिती असतं, की ते आपले शत्रूच आहेत. त्यामुळे अशा शत्रूंचा आपण सहज सामना करू शकतो. परंतु जे आपल्या खूप जवळचे लोक असतात, आणि त्यांनी जर धोका दिला तर मात्र आपण मोठ्या संकटात सापडू शकतो, कारण आपण या गोष्टीची कल्पना देखील केलेली नसते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. अशा लोकांपासून वाचायचं कसं? याबद्दल देखील चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका – चाणक्य म्हणतात या जगात असे काही लोक असतात, जे त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आपल्याशी गोड बोलतात. आपला विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात. आपण देखील अशा लोकांवर लगेच विश्वास ठेवतो, मात्र अशा लोकांपासून आपल्याला भविष्यात धोकाच मिळतो. त्यामुळे लगेच कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, आधी त्या व्यक्तीला प्रत्येक कसोटीवर तपासून घ्या आणि मगच त्याच्यावर विश्वास ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

अशा लोकांपासून नेहमी सावध रहा – चाणक्य म्हणतात जे लोक नेहमी तुमच्या कमकुवत बाजू शोधण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, भलेही तो व्यक्ती तुमच्या कितीही जवळचा असू द्या, परंतु तुम्ही अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, त्यातच तुमचं हीत आहे, अन्यथा असा व्यक्ती तुमची फसवणूक करू शकतो.

आपल्या योजना गुप्त ठेवा – अनेकदा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही योजना तयार करत असतात, मात्र अशा योजना या गुप्त ठेवा, तुमच्या कितीही जवळचा व्यक्ती असू द्या, त्याला कधीही तुमच्या भविष्याकालीन योजना सांगू नका, कारण जेव्हा असा व्यक्ती तुमचा शत्रू बनतो, तेव्हा त्याच्यापासून तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या योजना गुप्तच ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

नात्याला वेळ द्या – चाणक्य म्हणतात जर तुमच्यासोबत एखाद्या व्यक्तीने मैत्री केली तर त्याला लगेच तुमच्यासंदर्भातील सगळ्या गोष्टी सांगून मोकळे होऊ नका, तर नव्या नात्याला वेळ द्या. जेव्हा तुम्हाला अशी खात्री पटेल की तो व्यक्ती तुमची फसवणूक करणार नाही, तेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात, असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.