Dombivli Politics: निवडणुकीत विरोधक, विकासकामात एकत्र; म्हात्रे कुटुंबाच्या व्यासपीठावरील भेटीने डोंबिवलीच्या राजकारणात खळबळ
esakal June 30, 2026 01:45 AM

डोंबिवली : केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांत सक्रिय असले तरी विकासकामाच्या निमित्ताने ते एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे आणि शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे गणेशनगर येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकत्र दिसल्याने डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

प्रभाग क्रमांक २१ मधील गणेशनगर, अमर गॅलॅक्सी आणि वृंदावन टॉवर परिसरातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण व नवीन गटाराच्या कामासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे आणि अन्य कुटुंबीय एकाच व्यासपीठावर आल्याने उपस्थितांमध्ये विविध राजकीय चर्चांना उधाण आले.

याबाबत प्रल्हाद म्हात्रे म्हणाले, "पाण्यावर काठी मारली तर ते दोन सेकंद वेगळे होते, पण लगेच पुन्हा एक होते, हे माझ्या वडिलांचे शब्द आज आठवले. परमेश्वराने ती इच्छा पूर्ण केली. या रस्त्यासाठी जनार्दन म्हात्रे यांनी निधी मंजूर करून आणला. मात्र त्यांनी माझे बंधू या कार्यक्रमाला यायला हवेत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही एकत्र आलो, याचा आनंद आहे."

तर जनार्दन म्हात्रे म्हणाले, "कुटुंब एकत्र आल्याचा आनंद सर्वात मोठा असतो. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता?"

प्रभाग क्रमांक २१ मधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी जनार्दन म्हात्रे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली तरी गणेशनगर, अमर गॅलॅक्सी आणि वृंदावन टॉवर परिसरातील रस्ता प्रलंबित होता. त्यासाठी त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना आमदार राजेश मोरे यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर खासदार निधीतून या कामासाठी १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

यावेळी आमदार राजेश मोरे म्हणाले, "या कामासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास त्याचीही कमतरता भासू दिली जाणार नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी नेहमीच तत्पर आहेत. त्यामुळे निधीची चिंता करण्याची गरज नाही."

भूमिपूजन सोहळ्यास नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, रेखा जनार्दन म्हात्रे, संदेश बंडू पाटील, डॉ. रसिका संदेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश मोरे, जनार्दन परशुराम म्हात्रे, प्रियदर्शनी कुंदन म्हात्रे, अक्षय जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेवक सोपान पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.