आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीदरम्यान 4 ते 9 जुलै या कालावधीत सार्वजनिक सुरक्षेच्या कारणास्तव गर्दीचे व्यवस्थापन नियंत्रित राहावे यासाठी आळंदीतील धर्मशाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये विवाह, साखरपुडा यांसारखे कार्यक्रम आयोजित करू नयेत, अशा स्पष्ट सूचना आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी मंगल कार्यालय चालक-मालक व धर्मशाळा व्यवस्थापक यांना आज दिल्या.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलीस ठाण्यात शहरातील मंगल कार्यालय चालक-मालक तसेच धर्मशाळेचे विश्वस्त, व्यवस्थापक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. नरके यांनी सांगितले, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आठ जुलैला आळंदीतून होत असून नऊ जुलैला पालखी पुण्याला मार्गस्थ होणार आहे. वाहतुकीचे नियोजन आणि गर्दीचे व्यवस्थापन नियंत्रित राहावे याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे. लग्नकार्यामुळे शहरावर या काळात अतिरिक्त गर्दीचा ताण पडणार आहे. तो टाळण्यासाठी मंगल कार्यालय व धर्मशाळांनी वारी काळात लग्नाचे बुकिंग करू नये. जुन्या, धोकादायक इमारती असलेल्या धर्मशाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम टाळावा. आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच अशा इमारती वापराव्यात. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र निवास व स्नानगृहांची व्यवस्था असावी, स्नानगृहे सुरक्षित व बंदिस्त असावीत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार किंवा मोबाईलद्वारे चित्रीकरण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व धर्मशाळा व मंगल कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे, अनोळखी व्यक्तींना प्रवेश न देणे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने ‘112’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले, वारकऱ्यांना केवळ ताजे व दर्जेदार अन्न देण्यात यावे, शिळे अन्न वितरित करू नये. उरलेले अन्न रस्त्यावर टाकू नये. कचरा व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यासह नगरपरिषदेच्या घंटागाडीतच कचरा टाकावा. पालखी सोहळ्यादरम्यान पाणीपुरवठा आणि टँकरची व्यवस्था पूर्वनियोजितप्रमाणे उपलब्ध राहील. गर्दीच्या काळात दोन दिवस कचरा धर्मशाळांमध्येच साठवून नंतर त्याची विल्हेवाट लावावी, तसेच या कालावधीत नवीन बांधकामे सुरू करू नयेत, असेही त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी पालखी मार्गावर पालखी मार्गस्थ होताना वाहने रस्त्यावर उभी करू नयेत, असे सांगितले.
वारकऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था असून पालखी मार्गावर किंवा सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करू नयेत. ध्वनिक्षेपकांचा वापर मर्यादित ठेवावा आणि आवाज केवळ संबंधित परिसरापुरताच राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या.