FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं
esakal July 04, 2026 03:45 PM

लॉस एंजेलिस ः स्पेनने १६ वर्षांपूर्वी विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर फुटबॉलमधील या सर्वांत मोठ्या स्पर्धेत त्यांना बाद फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता, अखेरीस या वेळी ऑस्ट्रियावर ३-० असा विजय नोंदवून युरोपियन विजेत्यांनी प्रतीक्षा संपुष्टात आणत उपउपांत्यपूर्व (राउंड ऑफ १६) फेरी गाठली.

मिकेल ओयार्झाबाल याने केलेले दोन गोल (३६ व ८९ वे मिनिट), तसेच पेद्रो पोरो याने ६६व्या मिनिटास केलेला पहिला वैयक्तिक आंतरराष्ट्रीय गोल यामुळे स्पेनला एकतर्फी विजय शक्य झाला. त्यांचा अठरावर्षीय लामिन यमाल याचा चतुरस्त्र खेळ विजयात महत्त्वपूर्ण ठरला. त्याने ऑस्ट्रियन बचावावर प्रचंड दबाव टाकला. ओयार्झाबाल याने यावेळच्या स्पर्धेत चार गोल केले आहेत.

Explained : ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी Fixing, क्रोएशियावर अन्याय? चाहत्यांनी मैदानावर फेकल्या बाटल्या... VAR च्या निर्णयानंतर नेमकं काय घडलं? Video

उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा संघ पोर्गुगालविरुद्ध खेळेल. ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात स्पेनचा एक गोल नामंजूर झाला, तर एकवेळ फ्रीकिक फटक्यावर चेंडूने गोलपोस्टचा वेध घेतला, त्यामुळे लुईस दे ला फुएंते यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आणखी मोठा विजय शक्य झाला नाही. २०१४ मध्ये बाद फेरी, तर २०१८ व २०२२ मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत गारद झाल्यानंतर स्पेनचा विश्वकरंडकातील हा पहिलाच बाद फेरी विजय ठरला.

हॉलीवूड सितारे पेनेलॉप क्रूझ, हावियर बार्डेम, गायिका रोझालिया यांच्या उपस्थितीत झालेल्या सामन्यात लॉस एंजेलिस स्टेडियमवर स्पॅनिश पाठीराखेच जास्त होते. खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले नाही.

लामिन यमालच्या कॉर्नर फटक्यावर मार्क कुकुरेला याचा गोल ऑफसाईड ठरल्यानंतर ओयार्झाबाल याने कुकुरेलाच्या क्रॉस पासवर संघाला अपेक्षित सुरुवात करून दिली.  या गोलनंतर ॲलेक्स बाएना याचा फ्रीकिक फटका गोलपट्टीला आपटला, तर यमाल याचा अगदी जवळून फटका गोलरक्षक अलेक्झांडर श्लागर याने वेळीच अडविला. 

तासाभराच्या खेळानंतर स्पेनची आघाडी वाढली. बाएना याच्या शानदार क्रॉस पासवर पोरो याचे हेडिंग अचूक ठरले. निर्धारित वेळेतील सामना संपण्यासा एक मिनिट बाकी असताना कुकुरेला याच्या क्रॉस पासवर ओयार्झाबाल याने स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

स्पॅनिश गोलरक्षकाचा पराक्रम!

दुसऱ्यांदा विश्वकरंडकात खेळणारा स्पेनचा २९ वर्षीय गोलरक्षक उनाई सिमोन याने २०२६ मधील स्पर्धेत सलग ५१९ मिनिटे गोल न स्वीकारण्याचा (क्लीन शीट) पराक्रम बजावला आहे. त्याच्या दक्ष कामगिरीमुळे स्पेनने यंदा लागोपाठ चौथ्या सामन्यात क्लीन शीट राखली. उनाई याने इटलीचा गोलरक्षक वॉल्टर झेन्गा याचा विक्रम मोडला. झेन्गा याने १९९० मध्ये ५१७ मिनिटे गोल स्वीकारला नव्हता. 

POR vs CRO: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न कायम! Goncalo Ramosचा अविश्वसनीय गोल, पोर्तुगालचा नाट्यमयरित्या क्रोएशियावर विजय

संघाला मदत केल्याने पुढील फेरी गाठता आली याचा मला आनंद आहे. प्रतिस्पर्धी संघ शारीरिकदृष्ट्या मजबूत असल्याने  हा सामना खूपच कठीण असेल याची आम्हाला जाणीव होती, मात्र आमच्यासाठी दिवस खूपच चांगला ठरला. 

- मिकेल ओयार्झाबाल, स्पेनचा खेळाडू

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.