BLOG : चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. या म्हणीतला उल्लेख हा केवळ खाण्यापुरता मर्यादित असला तरी त्यामागे जीवनाचा सकारात्मकतेनं आनंद घेण्याच्या आणि समाधानानं जगण्याच्या वृत्तीचा खूप मोठा अर्थ दडलाय. आयुष्याचा सकारात्मकतेनं आनंद घेण्याची वृत्ती असलेल्या माणसाला देवही भरभरून देतो असं म्हणतात. माझा मित्र चंद्रशेखर कुलकर्णी म्हणजे चंदू हा तसाच पट्टीचा खवय्या आणि चवीनं जगणारा माणूस होता. शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक वि. गो. कुलकर्णींच्या या लेकाला तल्लख बुद्धी, दांडगी स्मरणशक्ती आणि असामान्य प्रतिभेचं वरदान उपजतच लाभलं होतं. त्यामुळं पत्रकार किंवा लेखक म्हणून जगताना चंदूनं आपल्या सभोवतालच्या जगाचा कायम सकारात्मकतेनं आनंद घेतला आणि आपण समृद्धपणे अनुभवलेल्या त्या जगाचा त्यानं आपल्या वाचकांनाही भरभरून आनंद दिला. चंदूनं त्याच्या ६१ वर्षांच्या आयुष्यात केवळ चवीनं खाल्लंच नाही, तर त्यानं चवीनं वाचलं, आजूबाजूचं जग त्यानं चवीनं पाहिलं, त्यानं चवीनं गाणं ऐकलं, चवीनं नाटक आणि सिनेमा पाहिला, चवीनं अगदी जगभर भटकंती केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु केली, त्यावेळी पाकिस्तानला जाताना दिसलेला त्याचा उत्साह हा देशविदेशात किंवा अगदी पुणं-श्रीवर्धनला जातानाही त्याच्यामध्ये कमालीचा असायचा. नवं काही तरी जाणून घेण्याची आणि ते मराठी जनमानसाला आपल्या शैलीतून सांगण्याची त्याची भूक कायम होती.
खरं तर माटुंग्याच्या रुईया कॉलेजात शिकत असताना, नवशक्तीत महाविद्यालयीन सदर लिहिण्याच्या निमित्तानं चंदू १९८५ सालीच पत्रकारितेत आला आणि तिथंच त्याच्या भावी आयुष्याची वाट कदाचित निश्चित झाली असावी. मग सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये लक्षवेधक बातमीदारी करत करत तो 1995 सालाच्या सुमारास लोकसत्तात रुजू झाला. मी त्यावेळी सांज लोकसत्तामध्ये होतो. पण माझी आणि चंदूची ओळख त्याआधीची. त्यावेळी तो महाराष्ट्र टाईम्समध्ये होता. माझ्या क्रीडा पत्रकारितेची सुरुवात ही दैनिक सामनातली. आमच्या दोघांमधला दुवा म्हणजे सुहास गांगल मला सामनात भेटला. त्या काळात आम्हा पत्रकारांना बबनशेठच्या चहाचं आणि त्यांच्या चहाच्या ठेल्यावर गप्पांच्या देवाणघेवाणीचं व्यसन होतं. सुहास गांगल आणि देवदास मटाले यांच्या साथीनं मी चहा आणि गप्पांच्या त्या मैफिलीत सामील झालो. ही सारी मंडळी माझ्यापेक्षा वयानं तीनचार वर्षांनी मोठी होतीच, पण त्यात चंदू राजकारण, समाजकारण, संगीत, साहित्य, सिनेमा, नाटक, क्रिकेट आदी विविध प्रांताविषयीच्या ज्ञानानं समृद्ध होता. बरं हे काही फक्त कानोकानी नव्हतं, त्याचं पुस्तकांचं आणि विविध क्षेत्रांमधल्या छोट्यामोठ्या माणसांविषयीचं वाचन दांडगं होतं. त्यामुळं त्याच्याशी बोलताना किंवा त्याचं महाराष्ट्र टाईम्समधलं लिखाण वाचताना नवं काही तरी समजायचं, नवं शिकायलाही मिळायचं.
चंदूची लिखाणाची शैली ही फक्त ओघवती नव्हती, तर आपल्या समृद्ध जगण्यातून समोरच्यालाही चार गोष्टी समजावून सांगण्याची त्याची हातोटी होती. त्यामुळं शिक्षण किंवा सामाजिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची बातमी असो, चटकदार या हॉटेलिंग सदराचा मजकूर असो, लाल परी या एसटी बसच्या अनुषंगानं लिहिलेल्या सदराचा मजकूर असो किंवा एखाद्या बातमीसाठी त्यानं सुचवलेला मथळा असो... त्यात खूप वेगळेपण असायचं. आणि वाचताक्षणी ते मनाला भावायचं. पण चंदूच्या या ज्ञानाचं, त्याच्या शैलीचं किंवा पत्रकार म्हणून मोठा असण्याचं कधी दडपण आलं नाही. कारण त्यानं समोरच्याला कायम आपला मित्र समजून एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला किंवा वेळोवेळी त्याच्या मदतीसाठी पुढे केला. चंदूनं क्रीडा पत्रकारितेतल्या माझ्या धडपडीला नेहमीच शाबासकी दिली आणि वेळोवेळी मला प्रोत्साहन दिलं.
मी सांज लोकसत्तात असताना १९९७ साली एमसीएच्या कांगा लीग ए डिव्हिजन विजेत्या क्लब्सवर कांगा नाबाद ५० हे सदर चालवलं होतं. त्यात पारसी सायक्लिस्टस या त्यावेळी अमृतमहोत्सव साजऱ्या करणाऱ्या क्लबवर लिहिताना, मी मथळ्यात आणि एन्ट्रोमध्ये अवघे पाऊणशे वयोमान वगैरे बाबी जुळवून आणल्या होत्या. त्यावेळी सांज लोकसत्ताची ताजी आवृत्ती सकाळी साडेदहा-अकराच्या सुमारास तळमजल्यावरच्या प्रेसमधून कार्यालयात यायची. त्यादिवशी चंदू कदाचित लवकर ऑफिसला आला होता. माझा मथळा आणि सदर वाचून तो तडक लोकसत्तामधून पोटमाळ्यावरच्या सांज लोकसतात आला आणि त्यानं मला शाबासकी दिली. त्याच दिवशी चंदू आणि माझी खऱ्या अर्थानं मैत्री झाली आणि मग ती अधिकाधिक घट्ट होत राहिली. एक्स्प्रेस वृत्तसमूहानं सांज लोकसत्ता बंद करून, आम्हाला लोकसत्तात सामावून घेतलं, त्यावेळी मला मानसिक आधार आणि प्रोत्साहनही देणारा पहिला सहकारी हा चंदूच होता. माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून चंदूकडून वेळोवेळी मिळालेलं हे प्रोत्साहन खूप मोलाचं होतं.
चंदू एक मित्र या नात्यानं पाठीवर शाबासकीची थाप देताना अधूनमधून, अगदी आवर्जून गिफ्टही देत असे. एरवीही चंदूनं आपल्या मित्रांसाठी कधी हात आखडता घेतला नाही. पण त्याच्याकडून उत्तम गिफ्ट मिळवायचं तर त्यासाठी तुम्ही काही तरी उत्तम लिहिणं त्याला अपेक्षित असे. मला एखादा शर्ट किंवा पेनं अनेक मिळालीयत. पण धों. वि. देशपांडे यांचं राजमुद्रा हे पुस्तक चंदूनं मला दिलेलं सर्वोत्तम गिफ्ट होतं. ते पुस्तक माझ्या हातात देताना त्यानं आधी धों. वि. देशपांडे मला समजावून सांगितले. मग सांगितलं की, ते त्याच्या वडिलांचे म्हणजे वि. गो. कुलकर्णींचे जवळचे मित्र होते. त्यामुळं मग त्यांच्याशी गप्पा मारण्याची आपल्याला कशी संधी मिळालीय, हेही त्यांनं खुलवून सांगितलं होतं. आपल्या लिखाणाचा विषय असलेली समोरची व्यक्ती ही समाजात कितीही मोठी असली तरी ती प्रात:स्मरणीय आहे का, या मुद्द्यावर धों. वि. देशपांडे लिहिते होत. त्यामुळंच राजमुद्रा पुस्तकातल्या थोरामोठ्यांवरच्या चरित्रलेखात ते अतिशय कणखरपणे व्यक्त झालेत. खेळांच्या दुनियेतल्या दिग्गज व्यक्तींकडे पाहताना आपण कळत नकळत त्यांच्या मैदानातल्या कर्तृत्त्वाच्या निकषावर वाहवत जाण्याची शक्यता असते. पण त्यापलिकडे समाजात वावरताना या दिग्गजांनी आपले हात स्वच्छ ठेवलेयत का किंवा समाजासाठी आपले हात कधी मोकळे सोडलेयत का याचाही उहापोह माझ्याकडून होऊ लागला तो धों. वि. देशपांडे यांचं राजमुद्रा वाचल्यानंतरच. त्याचं श्रेय 'धोंवि' यांच्याइतकंच मला चंदूलाही द्यायला हवं. खेळांच्या आकडेवारीच्या अलिकडे आणि पलिकडेही असलेलं जग एक क्रीडा पत्रकार म्हणून समजून घ्यायचं, तर तशी दृष्टी हवी आणि त्यासाठीच चंदूनं मला नेमकं गिफ्ट दिलं होतं.
लोकसत्तामधल्या सान्निध्यात एक मित्र आणि एक पत्रकार म्हणून चंदू रोज नव्यानं उलगडत होता. लालबागच्या चिवडा गल्लीत हनुमान थिएटरपासून अर्ध्या मिनिटावर लोकसत्ताचं कार्यालय होतं. तिथून पुढच्या कोपऱ्यावर एक चहाची टपरी होती. तिथं आमची दुपार आणि संध्याकाळ चहाच्या रतीबानं साजरी व्हायची. मी, चंदू आणि सुहास गांगल चहाच्या घोटासोबत दिवसभरातल्या बातम्यांवर गप्पा मारायचो. त्यात खेळाच्या मैदानावर काय घडतंय हे अगदी रोज जाणून घेणारा चंदू हा माझ्यासाठी पहिला ज्येष्ठ सहकारी होता. त्याचा क्रीडाविश्वातल्या घडामोडींबाबतचा मैदानापलिकडचा इंटरेस्ट मला २००३ सालच्या क्रिकेट विश्वचषकादरम्यानही जाणवला. त्या विश्वचषकाच्या काळात लोकसत्ता दररोज चार पानी खास कव्हरेज करत होता. आणि त्यावेळी मला चंदू आणि सुहाससोबत थेट काम करायची संधी मिळाली. त्या दीडेक महिन्याच्या काळातल्या अनेक आठवणी माझ्या मनात आजही ताज्या आहेत. पण महत्त्वाची आठवण म्हणजे, २००३ सालच्या विश्वचषकात फायनलमध्ये धडक मारण्याआधी टीम इंडियाच्या मोहिमेची सुरुवात खूप खराब झाली होती. आपण सलामीला नेदरलॅण्डला हरवलं होतं, पण त्या सामन्यात नेदरलॅण्डनं भारताला २०४ धावांत गुंडाळलं होतं. मग ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्यानंतर देशात भारतीय संघाविरोधात वातावरण निर्माण झालं होतं. मोहम्मद कैफच्या घरावर दगडफेक झाली होती. माझ्या आणि चंदूच्या त्यावेळच्या गप्पांमध्ये हीच वेळ आहे की देश म्हणून आपण टीम इंडियाच्या पाठीशी उभं राहायला हवं असा सूर निर्माण झाला. आणि मग चंदूनं एडिट पानावर लिहिलेलं स्फुट माझ्या आजही स्मरणात आहे. विश्वचषकातला केवळ एक पराभव आपल्या राष्ट्रभावनेत कशी चुकीच्या पद्धतीनं तेढ निर्माण करतोय यावर चंदूनं भाष्य केलं होतं. विश्वचषकात मुसुंडी मारण्याची आपल्याला अजूनही कशी संधी आहे हाही मुद्दा त्यानं ठासून मांडला होता. आणि मग त्यानंतर टीम इंडियानं गाठलेली विश्वचषकाची फायनला हा सारा इतिहास आज आपल्यासमोर आहे.
चंदूसोबत लोकसत्ताच्या लालबाग ऑफिसमध्ये असताना त्याची खवय्येगिरी मी जवळून पाहिली. आम्ही सारे सहकारी एकमेकांचे डबे फस्त करताना, तोही आमच्यासोबत असायचा. त्या डब्यांमधल्या आवडलेल्या मेन्यूवर चंदूचा हक्क जरा जास्तच असायचा आणि मग त्यावर त्याचं पोटभर विश्लेषणही व्हायचं. मुंबईत छोट्यामोठ्या ठेल्यापासून किंवा उपाहारगृहापासून अगदी बड्या हॉटेल्सपर्यंत कुठं काय चांगलं खायला मिळतं याची चंदूला इत्यंभूत माहिती असायची. मला तो वेळीअवेळी तिथं घेऊन जायचा. तिथल्या ठेलेवाल्याला, वेटरला किंवा मॅनेजरला आपल्याला नेमकी कशी डिश हवीय, हे अधिकारवाणीनं सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचे भावही खूप काही सांगून जायचे. कळकट मळकट ठेल्यावरच्या भेळपुरीपासून झणझणीत-सणसणीत वडापाव, मिसळपाव, उपाहारगृहातलं शाकाहारी-मांसाहारी जेवण किंवा उंची हॉटेलात इन्टरकॉन्टिनेटल फूडचा चवीनं आनंद घेतल्यावर तृप्तीचा ढेकर देणारा चंदू हा त्या मंडळींचं मग लाडकं गिऱ्हाईक किंवा कस्टमर होऊन जायचा. पण कुठेही गेलं की कच्च्या हिरव्या मिरच्या खाण्याचा त्याचा सोस मला कधीच समजला नाही, आणि जमला तर मुळीच नाही. तिखट खाणं आणि गोठवणाऱ्या थंडीतही सहज वावरणं ही कदाचित त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी होती.
मी 2007 साली लोकसत्तामधून, त्यावेळच्या स्टार माझात दाखल झालो. चंदूही सकाळमधून लोकमत वृत्तसमूहात आला. आणि एक दिवस अचानक त्यानं एका वृत्तवाहिनीची त्याला आलेली ऑफऱ माझ्या कानावर घातली. त्यासाठी नेटवर्कच्या मालकांसोबत त्याचा इन्टरव्ह्यूही झाला, कार्यकारी संपादक म्हणून नियुक्तीचं पत्रही चंदूच्या हातात पडलं. योगायोगानं त्याच दिवशी आमची भेट झाली. त्यामुळं ते पत्रही चंदूनं मला दाखवलं. पण अचानक सुरु झालेल्या आजारपणानं चंदूला तिथं जॉईन व्हायची संधीच दिली नाही. त्यामुळं चंदूच्या वैयक्तिक करीअरचं नुकसान झालंही असेल, पण त्यापेक्षाही मोठं नुकसान त्या वृत्तवाहिनीचं आणि तिथल्या तरुण पत्रकारांचं झालं असावं. कारण त्यांच्यावर चंद्रशेखर कुलकर्णीचे संस्कार व्हायचे राहून गेले.