मुंबई: मुंबईत आज अवघ्या तीन तासांत (सकाळी ८.३० ते सकाळी ११.३० पर्यंत) जोरदार पावसाने (Mumbai Rain) हजेरी लावली आहे. या तीन तासांच्या कालावधीत कुलाबा येथे २९ मिमी, तर सांताक्रुज येथे ४८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, ४ जुलै रोजी मुंबई महानगराला अतिमुसळधार (Mumbai Rain) पावसाचा (Red Alert) इशारा दिला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.(Mumbai Rain)
मुंबईत पावसाचा हाहाकार सुरू असतानाच आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील एका मुख्य रस्त्याला लागून असलेला भाग थेट खाली कोसळला आहे.या रस्त्याच्या कडेला असलेलं ेक भलं मोठं झाडंही खाली गाडलं गेलं, एका मोठ्या बांधकामाच्या साईट शेजारील मुख्य रस्ता आणि त्याचा कडा प्रचंड प्रमाणात खचला असून, संपूर्ण माती आणि सिमेंटचा भाग खाली कोसळला आहे. सुदैवाने हा रस्ता खचला तेव्हा वाहने थोडी दूर होती, मात्र यामुळे महामार्गावरील वाहतुकीला मोठा फटका बसला असून शेजारील इमारतींनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील पावसाचा जोर आणि साचलेल्या पाण्यामुळे पायाभूत सुविधांची कशी दैना उडाली आहे, याचे हे विदारक चित्र आहे.(Mumbai Rain)
मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली जोगेश्वरी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. जोगेश्वरी एस आर पी कॅम्प गेट बाहेर रस्त्यावर ३ ते ४ फूट पाणी भरले आहे. रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहने या पाण्यात बंद पडली आहेत. यामुळे गोरेगाव कडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कठीण परिस्थितीत, जोगेश्वरी पोलिसांनी शाळकरी लहान मुलांना आपल्या हातात उचलून घेऊन रस्ता पार करून दिला आहे.
मालाड सबवे बंद: मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मालाड सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथे २ ते अडीच फूट पाणी भरल्यामुळे हा सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
अंधेरी MIDC आणि सीप्ज (SEEPZ) परिसर: पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा जंक्शन जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सीप्ज (SEEPZ) च्या गेट नंबर २ समोर पाणी भरल्यामुळे एमआयडीसी कडून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला (JVLR) जाणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याशिवाय एमआयडीसी परिसरातील वेरावली जलाशय जवळ रस्त्यावर २ ते अडीच फूट पाणी साचले आहे. हा एमआयडीसी ते जेव्हीएलआरला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने या संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली आहे.
विलेपार्ले आणि जुहू: विलेपार्ले पूर्व येथील नेहरू रोडवर १ ते दीड फूट पाणी भरले आहे, ज्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. तर दुसरीकडे, उच्चभ्रू आणि बॉलिवूड कलाकारांचे निवासस्थान असलेल्या जुहू परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
भांडुप: भांडुपमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे एलबीएस (LBS) मार्गिकेजवळील फूटपाथ खचला आहे, ज्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून, मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत आहे. त्यातच समुद्राला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ४.२६ मीटर इतकी मोठी भरती (High Tide) येणार आहे.
भरती आणि पाणी साचण्याच्या परिस्थितीमुळे महानगरपालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले असून नागरिकांना या मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे:
१. चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता
२. अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता
३. महानगरपालिका बाजारपेठ रस्ता
४. अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग (SV Road)
५. अंधेरी भुयारी मार्ग (अंधेरी सबवे)
६. विक्रोळी हुमा मॉल जंक्शन
७. गांधीनगर जंक्शन
८. परेश पार्क बाजारपेठ रस्ता
महानगरपालिकेचा इशारा: पाणी उपसण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गटरची झाकणे (मॅनहोल) उघडण्यात आली आहेत. त्यामुळे पायी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता अत्यंत सांभाळून प्रवास करावा.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे या शहरातील सुमारे १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. महापालिकेच्या सर्व २६ सहाय्यक आयुक्त विभागांना (वॉर्ड) आपापल्या ठिकाणी थांबून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, सुमारे १० हजार पालिका कर्मचारी ऑन फिल्ड कार्यरत आहेत.
मुंबई शेजारील ठाणे वंदना डेपो परिसरातही पाणी भरायला सुरुवात झाली असून हा परिसर पाण्याखाली गेला आहे. भरतीची वेळ असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे चित्र आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रशासनावर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले, "ठाणे महापालिकेने नालेसफाईसाठी १० कोटी रुपये खर्च केले, त्या पैशांचे काय झाले ते सांगावे. पालिकेचे नालेसफाईचे दावे पूर्णपणे फोल ठरले असून कोणतेही नियोजन केलेले नाही. वंदना डेपो येथे पंपिंग स्टेशन असून, पंपातून पाणी नाल्यात सोडले जाते, मात्र ते पुढच्या नाल्यातून पुन्हा रिटर्न या सखल भागात साचत आहे. अशाने पाण्याचा निचरा कसा होणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.