मुसळधार पावसात युवकाचा तोल गेला अन् थेट नदीत पडला, दहिसरच्या मिठी नदीत धक्कादायक घटना 
सत्यम सिंह July 04, 2026 08:13 PM

Mumbai Rain : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणातही जोरदार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही भागात देखील चांगला पाऊस पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, अशातच मुंबईतील दहिसरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर पश्चिम मध्ये मिठी नदीत युवक पडल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसादरम्यान युवकाचा नदीत तोल जाऊन पडल्याची माहिती मिळाली आहे.

रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद 

दहिसर पश्चिम मध्ये मिठी नदीत युवक पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अग्निशमाक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्यूब आणि दोरीच्या साहाय्याने युवकाचे थरारक रेस्क्यू करण्यात आलं आहे. सुमारे 15 फूट उंचीवरुन दोरीच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळं युवकाचा जीव वाचला आहे. पावसाळ्यात नद्या व नाल्यांच्या परिसरात नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरु

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर असेल पुण्याचा काही भाग, नाशिक याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. या भागात सातत्याने 6 जुलैपर्यंत मुसळधार  पाऊस असेल, वादळंही येतील. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  आपण दर तीन तासांनी आपण या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांन विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता ज्याप्रकारे पाऊस आणि वादळ आहे काही अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून अलर्ट  पाठवले जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. माझी लोकांना विनंती आहे की,  आपण नीट अलर्ट देतोय , लोकांनी ते अलर्ट फॉलो करावेत, शक्यतो त्याप्रमाणे बाहेर पडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाखाली जोगेश्वरी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या भागाला तलावाचे स्वरूप आले आहे. जोगेश्वरी एस आर पी कॅम्प गेट बाहेर रस्त्यावर ३ ते ४ फूट पाणी भरले आहे. रस्ता पूर्णपणे जलमय झाल्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहने या पाण्यात बंद पडली आहेत. यामुळे गोरेगाव कडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कठीण परिस्थितीत, जोगेश्वरी पोलिसांनी शाळकरी लहान मुलांना आपल्या हातात उचलून घेऊन रस्ता पार करून दिला आहे.

मुंबईच्या ताज हॉटेल समोर मोठे झाड कोसळलं

मुंबईच्या ताज हॉटेल समोर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. झाड थेट रस्त्यात कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. झाड कोसळल्याने गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.