संपूर्ण देशात सध्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. केतनला त्याची होणारी बायको सियाने लोहगड किल्ल्यावरून तिचा प्रियकर चेतनच्या मदतीने खाली ढकलले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोघांची कसून चौकशी सुरू आहे. केतन हा लग्नासाठी पसंत नसल्याने सियाने प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतनच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला असून एका जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केतनच्या आजोबांचे निधनसमोर आलेल्या माहितीनुसार केतन अग्रवालच्या आजोबांचे निधन झाले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्या स्टेट्सवर ‘मिस यु डॅड’ अशी पोस्ट केली आहे. त्यांच्या निकटवंतीयांनीही याला दुजोरा दिला आहे. देवीचंद अग्रवाल असं केतनच्या आजोबांचे नाव होते. ते आजारी होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या आधी त्यांची हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. नातू केतनची हत्या झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काहीवेळापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती समोर आली आहे. हा अग्रवाल कुटुंबाला मोठा धक्का मानला जात आहे.
पोलिसांनी दिली मोठी माहितीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे दोघं एकमेकांसोबत कोड वर्डमध्ये बोलत होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचे फोन जप्त केले आहेत. या घटनाक्रमाबद्दल चेतनकडे कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच सियाकडे देखील चौकशी करण्यात आली आहे, गुरुवारी सकाळी आम्ही सियाचा दुसरा मोबाईल देखील जप्त केला आहे. यापूर्वी सिया आणि चेतन यांचा एक -एक मोबाईल फोन पोलिसांनी आधीच जप्त केला होता. दुसऱ्या मोबाईलमधून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता हा मोबाईल फोन फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांनी कोड वर्डमधून नेमकं काय संभाषण केलं आणि त्याचा संबंध हा केतनच्या हत्येशी आहे का? याचा उलगाडा होण्याची शक्यता आहे.