पुणे : ‘‘पर्यावरणाचे रक्षण आणि समाजातील सकारात्मक बदल हे केवळ मंत्र्यांच्या घोषणा, सरकारी धोरणे किंवा आंतरराष्ट्रीय करारांतून घडणार नाहीत. हा बदल विद्यापीठांमधून, तरुणांच्या आणि लोकांच्या थेट सहभागातूनच शक्य आहे. निसर्ग हा साडेचार अब्ज वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला महान शिक्षक आहे, मात्र दुर्दैवाने माणूस त्याचा सर्वांत वाईट विद्यार्थी ठरला आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली.
‘एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठा’तर्फे ज्येष्ठ जलसंवर्धन तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या ‘पुनर्जीवित नदी बद्दह’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. शेंडे बोलत होते. या वेळी डॉ. राजेंद्र सिंह, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड-चाटे आणि कुलगुरू प्रा. गोपालकृष्ण जोशी उपस्थित होते.
डॉ. शेंडे यांनी शिक्षण व्यवस्था आणि निसर्गाशी तुटलेली नाळ यावर परखड भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘नद्या, झाडे, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या सहकार्यातूनच निसर्ग टिकतो. आजचे सुशिक्षित तरुण कृत्रिम बुद्धिमत्तेकडे ओढले जात आहेत, मात्र निसर्गाच्या बुद्धिमत्तेकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या सहली केवळ पर्यटनासाठी न जाता, त्या गावागावांत गेल्या पाहिजेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आणि पुस्तकी ज्ञान नसलेल्या तथाकथित ‘अशिक्षित’ लोकांकडून निसर्ग संवर्धनाचे खरे धडे आपण शिकले पाहिजेत.’’
डॉ. सिंह म्हणाले, ‘‘आधुनिक शिक्षणाने केवळ आपली प्रतिष्ठा आणि आर्थिक पॅकेज वाढवले आहे; पण त्याने आपली भावनिक बुद्धिमत्ता नष्ट केली आहे. आज देशात जिथे सर्वांत जास्त शिकलेली लोकं राहतात, तिथेच नद्यांवर सर्वाधिक अतिक्रमणे आणि पाण्याचे भीषण प्रदूषण झाले आहे. चंबळमध्ये आम्ही कोणत्याही देणगीदाराची वाट न पाहता तिथल्या स्थानिक महिलांच्या मदतीनेच २३ नद्यांचे पुनरुज्जीवन केले. नद्यांमध्ये पाणी आल्यानंतर दरोडेखोरांनी बंदुका खाली ठेवल्या आणि ते शेती करू लागले. नदी आणि निसर्ग वाचला की गुन्हेगारी आपोआप संपते, हे यातून सिद्ध झाले.’’
पुण्याच्या नद्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
‘‘पुणे हे संस्कृती, शिक्षण आणि विचारांचे शहर आहे. मात्र या शहरातून वाहणाऱ्या पाच नद्यांची अवस्था चिंताजनक आहे. नदी म्हणजे केवळ पाणी वाहणारा कालवा नव्हे, तर ती संस्कृती आणि निसर्ग यांना जोडणारा प्रवाह आहे. नद्या कोरड्या पडल्या, तर त्यासोबत संस्कृती आणि सभ्यतेचाही ऱ्हास होते. त्यामुळे या नद्या स्वच्छ, अविरत आणि मुक्तपणे वाहिल्या पाहिजेत. पुढील पिढीसाठी नद्यांचे अस्तित्व अबाधित राखणे आपली आहे,’’ असेही डॉ. सिंह यांनी नमूद केले.