माले : मुळशी धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर निसर्गसौंदर्य खुलल्याने वर्षाविहारासाठी पर्यटकांनी मुळशी धरण परिसरात मोठी गर्दी केली आहे.
मुळशी धरणात १ जुलैला केवळ ८.९२ टक्के पाणीसाठा होता. मात्र, गेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तो वाढून १७.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणात सुमारे ३.५३ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक सातत्याने सुरू असल्याने साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धरण परिसरासह ताम्हिणी घाट, आंबवणे, दावडी, शिरगाव आणि परिसरातील डोंगररांगांमध्ये धबधबे प्रवाहित झाले असून हिरवाईने नटलेले निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी रविवारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली. अनेकांनी धरण परिसर, ताम्हिणी घाट, अंधारबन, कुंडलिका व्हॅली आणि विविध पर्यटनस्थळांवर वर्षाविहाराचा आनंद लुटला. त्यामुळे परिसरात दिवसभर पर्यटकांची वर्दळ कायम होती.
मुसळधार पावसामुळे भात लागवडीसाठी आवश्यक पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
