लोणावळा : सलग सुरू असलेल्या पावसामुळे लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी (ता.६) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. तर, रविवारी रात्रीपर्यंतच्या ३६ तासांत लोणावळ्यात ४४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यासाठी ५ ते ७ जुलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
या स्थितीचा अंदाज घेऊन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संबंधित परिपत्रकानुसार हा आदेश जारी केला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला.