Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान
esakal July 06, 2026 03:45 AM

लोणावळा : लोणावळा शहरात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून, रविवारी (ता. ५) सायंकाळी पर्यंतच्या ३६ तासांत तब्बल ४४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. चालू पावसाळ्यात आतापर्यंत एकूण १,२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मागील वर्षी याच तारखेपर्यंत २,३९२ मिमी (९४.१७ इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अद्याप कमी असले, तरी जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने पावसाळा वेग पकडत असल्याचे चित्र आहे.

शनिवारी (ता.४) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या नऊ तासांच्या कालावधीतच १०५ मिमी (४.१३ इंच) पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर रात्रभर सुरू राहिलेल्या संततधार पावसामुळे पुढील २४ तासांचा आकडा थेट २६७ मिमी इतका झाला. टाटाच्या वळवण, लोणावळा तसेच नगरपरिषदेच्या तुंगार्ली धरणासह परिसरातील जलस्रोतांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत.

पर्यटकांना आवाहन

पर्यटकांनी धबधबे, नदी-नाले आणि जलाशय परिसरात सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक घरांमध्ये पाणी शिरले

शहरातील नांगरगाव परिसर, भुशी, ठोंबरेवाडी, भांगरवाडी येथील निशिगंध सोसायटी, निसर्गनगरी, तुंगार्लीतील बद्रीविशाल सोसायटीसह अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तू, फर्निचर व इतर साहित्याचे नुकसान झाले असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वेहेरगाव रस्ता पाण्याखाली

कार्ला फाटा ते वेहेरगाव येथील एकवीरा मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर अशीच पूरस्थिती निर्माण होत असूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.

त्यामुळे दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असेल तर या पूरपरिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

कार्ला, कुसगाव परिसराला फटका

कुसगाव बुद्रूक परिसरालाही मुसळधार पावसाचा फटका बसला असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, कार्ला व मळवली परिसरातील अनेक रहिवासी सोसायट्यांनाही पाण्याचा वेढा पडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.