Women's T20 World Cup 2026 Final, AUS W vs ENG W: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद सोफी मोलिनेक्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया महिला संघाने जिंकले आहे. रविवारी (५ जुले) लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंड महिला संघाला ७ विकेट्सने पराभूत केले.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने तब्बल ७ व्यांदा महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेची ट्रॉफी जिंकली आहे. बाकी कोणत्या संघाला ही स्पर्धा दोनदाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे २००९ पासून सुरू झालेल्या स्पर्धेवर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
T20 World Cup 2026 Final: एलिस पेरीची विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे अफलातून कॅच; पण तरी इंग्लंड दीडशे पारया सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर १५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने १७.१ षटकात ३ विकेट्स गमावत १५३ धावा करत सहज पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज बेथ मुनीने अर्धशतक केले आहे. तिने उपांत्य सामन्यातही महत्त्वाची अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान ऑस्ट्रेलिया या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिले.
या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियासाठी जॉर्जिया वॉल आणि बेथ मुनी सलामीला फलंदाजीसाठी उतरल्या होत्या. पण दुसऱ्याच षटकात जॉर्जिया वॉलला ९ धावांवर लॉरेन बेलने त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला होता. पण मुनीला युवा फोबी लिचफिल्डची साथ मिळाली.
या दोघींनी आक्रमक शॉट्स खेळण्यासोबतच एकेरी-दुहेरी धावा काढत धावफलक हलता ठेवला. त्यामुळे त्यांनी १०० धावांची शतकी भागीदारीही केली. या भागीदारीदरम्यान मुनीने अर्धशतक पूर्ण केले. लिचफिल्डही अर्धशतकाच्या जवळ होती. पण तिला १३ व्या षटकात चार्ली डीनने त्रिफळाचीत केले. लिचफिल्डने ३५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४८ धावा केल्या.
Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!ती बाद झाल्यानंतरही मुनीने आपली लय कायम ठेवली. तिला एलिस पेरीने दुसऱ्या बाजूने साथ दिली. मात्र विजयासाठी केवळ ११ धावांची गरज असताना १६ व्या षटकात बेथ मुनीला सोफी इक्लेस्टोनने पायचीत केले. तिला आधी पंचांनी नाबाद दिले होते. पण डीआरएसमध्ये बराच वेळ तपासल्यानंतर ती बाद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुनी १० चौकारांसह ४९ चेंडूत ६४ धावा केल्या.
त्यानंतर १७ व्या षटकात एलिस पेरीला लिन्सी स्मिथने इक्लेस्टोनच्या हातून १२ धावांवर झेलबाद करण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्या पंचांनी इक्लेस्टोनने झेल घेताना चेंडूचा स्पर्श जमिनीला लागल्याचे म्हटल्याने तिला नाबाद दिले. त्यानंतर पेरी आणि ऍश्ले गार्डरनने ऑस्ट्रेलियाला १८ व्या षटकात विजयापर्यंत पोहचवले. पेरी १३ धावांवर आणि गार्डनर ३ धावांवर नाबाद राहिली.
तत्पुर्वी, इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १५० धावा केल्या होत्या. इंग्लंडने एमी जोन्स (६) आणि डॅनिएल वॅट-हॉज (८) यांच्या विकेट्स लवकर गमावल्यानंतर कर्णधार नतालिया सायव्हर-ब्रंटने डाव सावरला होता. तिने आधी एलिस कॅप्सीला साथीला घेतले. कॅप्सी २३ धावा करून बाद झाली. हिदर नाईटही २ धावांवर बाद झाली.
पण फ्रेया केम्पने आक्रमक खेळताना कर्णधार नतालियाची साथ दिली. या दोघींमध्ये ८० धावांची नाबाद भागीदारी झाली, त्यामुळे इंग्लंडला दीडशे धावांपर्यंत पोहचता आले. नतालिया ५३ चेंडूत ५८ धावांवर नाबाद राहिली, तर फ्रेया केम्पने २८ चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार सोफी मोलिनेक्स, ऍनाबेल सदरलँड, ल्युसी हेमिल्टन आणि किम गार्थ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.