“मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये सरासरी 800 झाडं कोसळतात. पण काल एकाच दिवसात 350 झाडं पडली. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. म्हणून वर्क फ्रॉम होमची विनंती केली. दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वार वाहणार आहेत” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. “आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारं असणार आहे. त्याचा झाडांवर परिणाम होऊ शकतो. त्या दृष्टीने लोकांनी सजग राहणं आवश्यक आहे. लोकांनी सावध रहावं. शक्यतो प्रवास टाळावा. अत्यंत गरजेचं असल्याशिवाय प्रवास करु नये. युवा वर्गाला विशेष आवाहन आहे, आजचं वारं बघता त्यांनी टूरिजम टाळावं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलं.
“निसर्गाच्या माध्यमातून एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या गोष्टी गंभीर आहेत. पण काल साधारणतः ५० किमी ताशी वारे वाहत होते” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “कालची घटना दु:खद आहे. पण काल जी इमारत पडली, ती बेकायदेशीर होती. त्या इमारती मधील लोक नाहीत, पण ती इमारत ज्या शेजारच्या झोपडीवर पडली, त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना गंभीर आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई-पुणे महामार्ग बंद आहे. या घटना आहेत त्या निसर्गामुळे निर्माण झालेल्या आहेत. संपूर्ण महापालिका, आपत्कालीन कक्ष पूर्ण पणे रस्त्यावर उतरून सामना करत आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसम्हणाले.
खूप लोक अडकली नाहीत
“कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर लगेच यंत्रणा सज्ज होती. खूप लोक अडकली नाहीत. लगेच वाहतूक परावर्तित केली. गाड्या बाहेर काढत आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता मानखुर्द येथे होते” अशी माहिती फडणवीस यांनी दिली. “झालेल्या घटना व त्यावर केलेली कार्यवाही तसेच तयारी आधीच केलेली आहे. मला राजकीय बोलायचे नाही. त्याने झालेले मृत्यू परत आणता येत नाहीत. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज अर्धवट निवेदन करण्याऐवजी सभागृहासमोर उद्या संपूर्ण निवेदन करेन” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.