Ijazat Movie: इजाजत - प्रेमाची चिरतरुण कविता
समीर गायकवाड July 06, 2026 04:43 PM

Ijazat Movie: बाहेर घनगर्द पाऊस पडतोय आणि मी जाऊन पोहोचलोय त्या रेल्वे स्टेशनवर, जिथे कधीकाळी रेखा आणि नसीरुद्दीन त्या गदगदून आलेल्या, दाट अंधारात दडलेल्या स्टेशनवर एक रात्र घालवण्यासाठी अकस्मात एकत्र येऊन थांबले आहेत. एकमेकाला पाहून त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्यात. मागच्या जखमा ताज्या झाल्यात अन् काही खपल्या देखील निघाल्यात.

त्याच्या जीवनात आलेल्या 'दुसरी'ची आता काय अवस्था आहे हे तिला जाणायचेय अन् आपण कसे वाहवत गेलो, आपली चूक नव्हती हे त्याला सांगायचेय....

रात्रभर तो तिच्याकडे बघत बोलत राहतो; ती मात्र अधून मधून नजर चुकवत राहते. त्याला खरे तर तिची माफी मागायचीय पण एकाच दमात सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नाहीये.

तिलाही आठवत्येय की, सुरुवातीला आपण किती सुखी होतो; मात्र त्याने आपल्याशी प्रतारणा करावी याचा धक्का कसा पचवावा, हे तिला उलगडलेले नाही.

त्यांची अबोल तगमग पाहून रात्रभर तळमळत असणारा अंधार तिच्या अंगावरच्या शालीत तिला अलगद लपेटून चिंब झालाय अन् मंद पिवळसर उजेड त्याच्या ओलेत्या डोळ्यात झिरपतोय, निर्मनुष्य स्थानकावरच्या प्रतिक्षागृहाच्या खडबडीत दगडी भिंती त्या दोघांना रात्रभर अनुभवून सुन्न होऊन गेल्या आहेत, ते ज्या टेबलभोवती बसले होते तिथल्या खुर्च्या त्यांना जवळ आणण्यासाठी आसुसल्या आहेत. तर पहाटेच्या गारव्याला त्यांना एकत्रित बाहुपाशात घ्यायचे आहे.

ज्या बाकावर ते दोघे बसून आहेत त्याला मात्र त्यांचा अबोला भावतोय. स्थितप्रज्ञ होऊन त्या दोघांना तो आपल्या कवेत घेऊन बसलाय.

तिथल्या हेडलॅम्पला त्या दोघांना डोळे भरून पाहायचेय तर प्लॅटफॉर्मवरील लांबसडक कॉरिडॉरला त्यांचे खाली पडणारे अश्रू झेलायचे आहेत.

गुलाबाची एकेक पाकळी नितळ अल्वारपणे बाजूला काढावी तशा एकेक घटना तो तरलपणे तिच्या पुढ्यात मांडतोय, त्याचं दुखणं ऐकता ऐकता ती आतूनच धुमसून निघत्येय, आपण कुठे कमी पडलो याचा तिचा शोध संपत नाहीये अन् रातकिड्यांची किर्रर्र देखील सरत नाहीये.

तिला जाणून घ्याययचेय ती घरात नसताना 'त्या' रात्री घरात नेमके काय झाले होते? तो तसं का वागला होता? त्यालाही सत्य सांगायचेय, मात्र सत्य सांगताना त्याला तिचं मन पाकळीवरच्या दवबिंदूसारखं जपायचं आहे. अंतःकरणातला सल सांगता यावा याचा तो जीवापाड प्रयत्न करतोय, तो आता काहीतरी बोलेल या आशेने त्याच्याकडे डोळे लावून बसलेली त्या बंद खोलीची काचेची पिवळसर तावदाने डोळ्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्याकडे पाहतायत अन् शिसवी दरवाजा भिंतीत तोंड खुपसून मूक अश्रू ढाळतोय!

ती अधून मधून नाकावरचा चष्मा मागे सरकावण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे बघत्येय, त्याच्यात काय बदल झालेत याचा हळूच अंदाज घेतेय तर तिच्याकडे तिरक्या नजरेने डोळे भरून पाहत ती किती बदलली आहे याचे गणित तो करतोय.

बघता बघता पहाट सरत आलीय, आपल्या मनातलं मळभ त्यानं रितं केलंय. "झालं गेलं विसरून जा अन् माझ्याकडे परत ये" इतकंच सांगायचं बाकी राहिलंय. त्याच्या कबुली जबाबास केवळ निमिषार्धच राहिलाय .

दरम्यान रात्रभर झोपी गेलेल्या सभोवतालच्या झाडांच्या पालवीला आता जाग आलीय अन् वाऱ्याचाही रात्रीचा सूर बदललाय.

'तो' मनाचा हिय्या करून तिच्याशी आता बोलणार  इतक्यात तांबड्या पिवळ्या सुर्यकिरणांना सोबत घेऊन "तोही ' तिथे येतो! हा ‘तो’ म्हणजे तिचा सध्याचा पती!
त्याच्याकडे नजर जाताच ह्याचे शब्द गळ्यात विरतात, अश्रू डोळ्यात विझून जातात. स्तब्ध होऊन जागीच थिजून जातो.

रात्रभर दोलायमान झालेलं तिचं मन 'त्याला' पाहून किंचित खुलून उठतं. तिचं हसू खरं की खोटं याचा अंदाज बांधत हा रडवेला होऊन जातो.

त्या दोघांना रात्रभर अनुभवणारे ते प्लॅटफॉर्म, ती खोली, त्या खिडक्या, तो दरवाजा, टांगता हेडलॅम्प, तांबडे पिवळे दिवे, तो बाक, ते टेबल, त्या खुर्च्या साऱ्यांना नियतीने चकवा दिलाय. सारेच हिरमुसलेत. मी देखील चेहरा बारीक करून तिथून निघालोय. पाऊसही पूर्ण थांबलाय...

बाहेर प्रसन्न सकाळ झालीय अन् आकाश निरभ्र झालंय. उंच आकाशात उडणाऱ्या बगळ्यांच्या त्रिकोणी थव्यात व्हिक्टरीचे 'व्ही' साईन शोधत मी किशोरदांच्या ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम....‘ या गीताची शीळ घालत निघालोय....

जीवन हे असेच आहे, एका हातात काही तरी गवसलेय म्हणेपर्यन्त दुसऱ्या हातातलं काही तरी गळून पडलेलं  असतं. 
साऱ्यांना सारं मिळत नसतं, जो क्षण समोर आहे त्याला स्वच्छंदीपणे समोर जाताना जीवनाशी व स्वतःशी प्रामाणिक राहिलं की दुःखाचा आनंदही सुखाइतकाच घेता येतो.

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे..... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनात वाट्याला आलेल्या नात्यांचा हळुवार उलगडा करणारी आर्त हळवी कविता आहे ..

मनात खोल रुतून बसणारी अन् उत्तुंग अभिनयाने सजलेली, अगदीच नटमोगरी नसली तरीही सोज्वळ चाफ्यासारखी दरवळणारी प्रेमपुष्पांची नाजूक गाथा आहे...

जेव्हा जेव्हा 'इजाजत' पाहतो, तेव्हा नात्यांचे अर्थ नव्याने शिकतो ...

जीवनातील सुखदुःखाच्या व्याख्या नित्य नव्याने सांगणार्‍या रुपेरी पडद्यास नम आँखोसे सलाम .....

विशेष नोंद - वेटिंग रूममधील एक सीनमध्ये त्याला सिगारेट पिण्याची हुक्की येते. 
न राहवून तो तिला "माचिस आहे का?" असं विचारतो. 
त्याचा सवाल पुरा होण्याआधीच काडीपेटी काढून त्याच्या हाती देते. 

तो विचारतो, "तू पूर्वी माझ्यासाठी माचिस ठेवत होतीस आता कुणासाठी ठेवतेस?" 
त्यावर ती उत्तर देते की, "माझ्यासाठी ठेवते." 
त्यावर तो चमकतो नि तिला म्हणतो की, "म्हणजे तू सिगारेट प्यायला लागलीस काय?" 
ती नाही म्हणते.
मग तो पुन्हा सवाल करतो. 

एक उसासा टाकत ती उत्तर देते, "तुझी विसरायची सवय गेली नाही आणि तुझ्यासाठी ठेवायची माझी सवय गेली नाही."
तिच्या उत्तराने प्रसवलेली व्याकुळता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटते. 

तो पुटपुटतो, "सवयी मोठ्या अजब असतात! श्वास घेणं ही देखील एक सवय होते, जगत राहणं ही देखील एक बेजान सवय होऊन जाते. केवळ जगत जातो, केवळ जगत जातो!..."  

एखाद्या कट्यारीने घाव केल्यावर जसे आघात होतात तसे आघात करण्याची क्षमता या सीनमध्ये आहे...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.