सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई,बाजारात तेजी कायम
Marathi July 06, 2026 08:25 PM

मुंबई: भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला. याचं कारण बँकांच्या शेअरची खरेदी आणि कच्चा तेलांच्या दरांमध्ये झालेली घसरण आहे. सेन्सेक्स 521 अंकांनी तर निफ्टी 50 निर्देशांक 160 अंकांनी वाधरला. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे देखील तेजीचं एक कारण आहे. सेन्सेक्स 521.16 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी वाढून 78,285.07 अंकावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 देखील 159.50 अंकांनी म्हणजेच 0.66  टक्क्यांनी वाढून 24,430.35 अंकांवर बंद झाला आहे.

Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी

भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये या काळात 1,806.4 अंकांची म्हणजेच 2.36 टक्के वाढ झाली आहे. तर निफ्टी मध्ये 564.6 अंकांची वाढ झाली आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर 3.59 टक्क्यांनी वधारला आहे. दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि मारुती सुझूकीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. दुसरीकडे कोटक महिंद्रा बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व आणि पावर ग्रिडच्या शेअरमध्ये घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर 71.53 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. याचा परिणाम देखील शेअर बाजारावर झाला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1355.33 कोटी रुपयांची खरेदी करत गुंतवणूक केली होती.  याचा परिणाम देखील शेअर बाजारावर पाहायला मिळाला आहे.

जियोजीत इन्वेस्टमेंट्स लिमिटेडचे रिसर्च प्रमुख विनोद नायर यांनी म्हटलं की “जागतिक संकेत संमिश्र असल्यानंतर देखील शेअर बाजारात सकारात्मक स्थिती पाहायला मिळाली. कच्च्या तेलाचे दर स्थिरावल्यानं बाजाराला दिलासा मिळाला. क्रूड ऑईलचे दर कमी झाल्यानं महागाई, पेट्रोलियम कंपन्यांचं होणारं नुकसान कमी होईल.

जागतिक पातळीवर एआय संदर्भातील शेअरची विक्री जोरदार सुरु असल्यानं आणि भारतात विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा गुंतवणूक केल्यानं मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये परिणाम दिसून आला. आशियाई बाजारात देखील तेजी पाहायला मिळाली.  3 जुलै रोजी बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमल्य 479 लाख कोटी रुपयांवर होतं. 6 जुलै रोजी ते 482 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. म्हणजेच गुंतवणूकादारांनी एका दिवसात 2.60 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.